अशोक घोडके यांजकडून…
गोतोंडी (वार्ताहर): म्हणतात ना..गावच्या राजकारणावरून देशाचे राजकारण ठरते त्याप्रमाणे इंदापूर तालुक्यात राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाची सत्ता असताना गोतोंडी गावच्या विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीवर एकतर्फी गौतमेश्र्वर विकास पॅनेलने बहुमत मिळवून सत्ताधार्यांच्या पदरी शून्य दिले आहे. माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी विजयी उमेदवारांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
गोतोंडी विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीच्या पंचवार्षिक निवडणूकीत भाजपप्रणीत गौतमेश्र्वर विकास पॅनेलने सर्वच्या सर्व 13 -0 असा विजय मिळवीत यश संपादन केले आहे.
गावपातळीवरील विकासामध्ये विविध कार्यकारी सोसायटी यांचे स्थान मोठे असून विजयी सदस्यांनी विकासात्मक कार्याला महत्त्व द्यावे असे प्रतिपादन माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी केले.
गावचे राजकारण म्हटले की, ईर्षा, कुरघोड्या, शह-काटशह या गोष्टी आल्याच. निवडणूक आली की, या गोष्टींना अगदी उत येतो. सत्ता संपादनासाठी कार्यकर्ते इरेला पेटतात, पण निवडणूक संपली की, मतभेद विसरून गावगाडा हाकला जातो, पण गेल्या काही वर्षांत इंदापूर तालुक्यातील राजकारण याला अपवाद ठरत आहे. येथील दोन गटाच्या राजकारणात एकमेकांना संपवायचेच, या सूड भावनेने काही मंडळी वागत आहेत. त्यातून संपूर्ण तालुक्याचे सामाजिक स्वास्थ्य बिघडत चालले आहे. ग्रामपंचायतीवर सत्ता स्थापण्यासाठी सूडभावनेने राजकारण करून सर्व शक्तीपणाला लावली जात आहे. जातीपातीच्या राजकारणाला ऊत आलेला आहे.