अशोक घोडके यांजकडून….
इंदापूर(वार्ताहर): भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी तथागत गौतम बुद्धांच्या पंचशीलाच्या माध्यमातून जगाला स्वातंत्र्य, समता व बंधुत्वाची शिकवण दिली. या शिकवणीच्या आधारावर राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या माध्यमातून इंदापूर तालुक्यात विकासाची गंगा वाहु लागली आहे. यांच्या प्रयत्नातून सामाजिक न्याय विभागाच्या माध्यमातून वालचंदनगर परिसरातील दलित वस्तीमधील विविध विकासकामांकरीता 4 कोटी 60 लाख रुपये मंजूर झाल्याने वालचंदनगर परिसरातील नागरिकांनी आनंद व्यक्त करून दत्तात्रय भरणे यांचे जाहीर आभार मानले.
विश्वरत्न, महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या 131 व्या जयंतीनिमित्त वालचंदनगर येथील बाबासाहेब आंबेडकर उद्यानामध्ये डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती प्रतिमेस राज्यमंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार श्री दत्तात्रय (मामा)भरणे यांनी पुष्पहार घालून विनम्र अभिवादन करून उपस्थित आंबेडकरप्रेमी जनतेला जयंतीनिमित्त शुभेच्छा दिल्या.
याप्रसंगी ना.भरणे म्हणाले की, माझ्यासारख्या शेतकरी कुटुंबातून पुढे आलेल्या कार्यकर्त्याच्या राजकीय, सामाजिक जीवनात नेहमीच वालचंदनगरवासीयांनी व येथील आंबेडकरप्रेमी जनता सदैव पाठीशी खंबीरपणे उभी रहात आल्याने माझ्यासारख्याला विविध पदे भुषवता आली व सर्वसामान्य जनतेची सेवा करण्याची संधी मिळाल्याचे सांगून देशभरासह जगातील कोट्यावधी जनतेचे श्रध्दास्थान व प्रेरणास्थान असलेले विश्वरत्न, महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा व भव्य जागा उपलब्ध असणारे वालचंदनगर येथील बाबासाहेब आंबेडकर उद्यान हे इंदापूर तालुक्यातील एकमेव ठिकाण असून अशा सुंदर उद्यानाच्या सुशोभीकरण व विकासाकरीता तातडीने 10 कोटी रूपयांचा विकास आराखडा तयार करून तो तत्परतेने मंजूर करणार असल्याची जाहिर ग्वाही नामदार श्री भरणे मामा यांनी उपस्थितांना दिली. तसेच 10 कोटी रूपयांच्या विकासकामांवर स्वतः लक्ष देऊन उद्यानातील विकासकामे दर्जेदार होण्यासाठी विशेष लक्ष देणार असल्याचेही यावेळी जाहीर करताच उपस्थितांनी टाळ्यांच्या गजरात नामदार श्री भरणे मामा यांच्या घोषणेला प्रतिसाद दिला.
4 कोटी 60 लाख रुपये मंजूर झालेल्या विकास कामांना येत्या काही दिवसांत सुरवात होणार आहे. विविध विकासकामांकरीता भरघोस निधी मंजूर केल्याबद्दल उपस्थित नागरिकांनी नामदार भरणे यांचे जाहीर आभार मानले.
यावेळी वालचंदनगर इंडस्ट्रीज लिमिटेडचे एम.डी ऍण्ड सीईओ चिरागशेठ दोशी, पुणे जिल्हा राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर, पुणे जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव पाटील, फॅक्टरी मॅनेजर धीरज केसकर, वालचंदनगर पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री.लातुरे, जिल्हा नियोजन समितीचे सदस्य सचिन सपकळ, इंदापूर तालूका संजय गांधी निराधार समितीचे अध्यक्ष सागर मिसाळ, राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष शुभम निंबाळकर यांच्यासह वालचंदनगर परिसरातील आंबेडकरप्रेमी जनता मोठ्या संख्येने उपस्थित होते.