पक्षाने कधीही काम करताना जातीपातीचा विचार केला नाही, हर्षवर्धन पाटील यांच्या जवळचे लोक या निर्णयापर्यंत का आले, याचे चिंतन त्यांनी करायला पाहिजे – उपमुख्यमंत्री ना.अजित पवार

अशोक घोडके यांजकडून…
इंदापूर(वार्ताहर): राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष काम करताना जातीपातीचा विचार करत नाही. हर्षवर्धन पाटीलांच्या जवळचे लोक आज या निर्णयापर्यंत येत असतील तर याचे चिंतन त्यांनी करायला पाहिजे असे प्रतिपादन राज्याचे उपमुख्यमंत्री ना.अजित पवार यांनी केले.

हर्षवर्धन पाटील यांचे खंदे समर्थक पुणे जिल्हा परिषदेचे माजी सदस्य श्रीमंत ढोले, राणी आढाव, युवक नेते दीपक जाधव, माजी सभापती स्वाती शेंडे, बापूराव शेंडे व त्यांच्या समर्थकांनी आज शरद पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यानिमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या मेळाव्यात अजित पवार बोलत होते.

यावेळी र ाष्ट्रवादी कॉंग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्ष रुपालीताई चाकणकर, जिल्हाध्यक्ष प्रदिप गारटकर, आमदार यशवंत माने, आमदार संजय शिंदे,पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष प्रा. दिगंबर दुर्गाडे, तालुकाध्यक्ष हणुमंत कोकाटे , पदाधिकारी, कार्यकर्ते व तालुक्यातील नागरिक मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते.

पुढे ना.पवार हर्षवर्धन पाटील यांचे नाव न घेता म्हणाले की, पूर्वीच्या निवडणुकीत सूत गिरणी काढण्याची हूल दिली. निवडणुकीनंतर सूतगिरणीचं नावही काढलं गेलं नाही. त्यानंतर अशोक चव्हाण मुख्यमंत्री असताना इंडस्ट्रीज काढण्यासाठी शेतकर्‍यांनी मातीमोल किमतीने जमीन दिल्या. पैसे गोळा करण्यात आले. पण, तिथं आज कुसळाशिवाय काही दिसत नाही. लोकांना किती बनवाल? अशा बनवाबनवीमुळेच राज्यमंत्री दत्तात्रेय भरणे यांनी बाबाला दोनदा कधी चितपट केले, हे कळलंच नाही. ही बनवाबनवी केली नसती तर हे घडलं नसतं. आम्ही कधी बनवाबनवी करत नाही, त्यामुळेच सव्वा लाखाने निवडून येतो आणि हे मात्र इंदापुरात पडतात. दत्तात्रय भरणेमामा आता चांगल्या पद्धतीने काम करत आहेत, त्यांना साथ द्या असेही आवाहन त्यांनी यावेळी केले.

शिक्षणाच्या चांगली दालने श्रीमंत ढोले आणि त्यांच्या सहकार्याने सुरू केली आहेत. बारामतीचा कायापालट खर्‍या अर्थाने कधी झाला, तर विद्यानगरी 1990 मध्ये उभारली, शारदा संकुल, माळेगाव संकुल उभारले गेले. शिक्षणाच्या सुविधांमुळे तेथील परिस्थिती बदलली. नुसती शिक्षण संस्था काढून चालत नाही तर त्याचा दर्जा चांगला असावा लागतो. पुण्या-मुंबईला लाजवतील अशा सुविधा ढोले यांनी येथे उपब्लध करून दिल्या आहेत. म्हणूनच अल्पावधीत जय भवानी विकास प्रतिष्ठा नावारुपाला आलेला दिसून येते. ढोले कसे काम करतात, हे भरणे सांगायचे, ते आज प्रत्यक्ष अनुभवायला आले, अशा शब्दांत पवारांनी ढोले यांचे कौतुक केले.

पुढे ना.पवार म्हणाले की, राजीव गांधी सायन्स पार्क बारामतीत सुरू केले आहे. परिसरातील शिक्षक, विद्यार्थ्यांनी जगात काय चालले हे पाहण्यासाठी तेथे एकदा जाऊन या. अधिकच्या सुविधा पाहिजे असतील तर त्याबाबत आम्हाला सांगा, त्या आम्ही करू. आता मसल आणि मनी पावर काही कामाचे राहिले नाही. आता नॉलेजची गरज आहे. ते असेल तरच आपण स्पर्धेत टिकू. राजकारणातून रोजीरोटीचा प्रश्न सुटणार नाही. त्यामुळे मिळणार्‍या शिक्षणाचा फायदा घेऊन आपण विकास साधला पाहिजे. आपल्या भागात नाही, ते खेचून आणले पाहिजे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!