संजय गांधी निराधार योजनेतील 484 प्रस्तावापैकी 474 प्रस्तावांना मंजुरी तर 10 प्रस्ताव पुढील बैठकीत घेणार
अशोक घोडके यांजकडून…
इंदापूर(वार्ताहर): राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांची खंबीर साथ असल्यामुळे संजय गांधी निराधार योजना घराघरात पोहचवून प्रत्येकास लाभ मिळवून देणार असल्याचे मत संजय गांधी निराधार योजनेचे अध्यक्ष सागरबाबा मिसाळ यांनी व्यक्त केले.
इंदापूर तालुका संजय गांधी निराधार योजनेची बैठक संपन्न झाली. यावेळी अध्यक्ष मनोगत व्यक्त करताना श्री.मिसाळ बोलत होते. या बैठकीस इंदापूर तालुक्याचे तहसीलदार श्रीकांत पाटील, नायब तहसीलदार श्रीमती. प्रियांका चयकर, संजय गांधी निराधार योजनेचे सदस्य हनुमंत कांबळे, महादेव लोंढे, नितीन शिंदे, दत्तात्रय बाबर, प्रमोद भरणे, शरद जगताप, सहा प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते.
पुढे श्री.मिसाळ म्हणाले की, इंदापूर तालुक्यातील गोरगरीब आणि माता-भगिनींना सर्व योजनांचा लाभ मिळवून देण्यामध्ये जिल्ह्याच्या इतिहासात इंदापूर तालुका हा एकमेव तालुका ठरेल. या बैठकीत आपंगाचे प्रस्ताव 82. इंदिरा गांधी वृद्धापकाळ निवृत्ती वेतन प्रस्ताव 47, श्रावण बाळ राज्य निवृत्ती योजना प्रस्ताव 210, संजय गांधी निराधार आनुदान योजना प्रस्ताव 227, श्रावण बाळाचे 7 बालक, संजय गांधीचे 3 बालक, या योजनेच्या लाभार्थ्यांचे प्रस्ताव एकूण 484 प्रस्ताव आले या यापैकी 447 प्रस्तावांना मंजुरी देण्यात आली तर उर्वरित 10 प्रस्ताव कागदपत्राच्या पूर्तता आभावी नामंजूर झाले. कागदपत्रांची पूर्तता केल्यास पुढील बैठकीत सदरील प्रस्ताव मंजूर करण्यात येतील असेही ते म्हणाले.