अशोक घोडके यांजकडून…
इंदापूर(वार्ताहर): इंदापूर तालुक्यात कोट्यवधींचा निधी आणला जात आहे. आतातरी मला निष्क्रिय म्हणणार्या लोकांनी शांत बसावे व इंदापूर तालुक्यात होत असलेल्या विकास कामांना मान्य करावे असा टोला राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी विरोधकांना लगावला.
इंदापूर तालुक्यातील काटी येथे 14 कोटी रुपयांच्या विविध विकास कामांचे उद्घाटन व भूमिपूजन राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते संपन्न झाले यावेळी झालेल्या जाहीर सभेत ते बोलत होते.
यावेळी तालुका अध्यक्ष हनुमंत कोकाटे, माजी सभापती प्रशांत पाटील, प्रताप पाटील, सचिन पाटील, साहेबराव मोहिते, सोमेश्वर वाघमोडे, निंबाळकर, संग्राम पाटील, छाया पडसळकर, विपुल वाघमोडे, दादा भोसले, डॉ अमोल गोरे, नंदू सोलनकर सर्व ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते. सपकळ, अतुल झगडे, अभिजीत तांबिले, सतीश पांढरे, बाळासाहेब करगळ, विष्णू हेमंत पाटील, वैभव वाघमोडे, शुभम निंबाळकर, सरपंच रेखा मरगळ, बाळासाहेब लोखंडे इ. मान्यवर उपस्थित होते.
माजी सभापती विलासराव वाघमोडे यांचे नाव न घेता ना.भरणे म्हणाले की, माझ्या विरोधात बोलताना तोंडाला फेस येतो, कोरड पडते. इंदापूर तालुक्यात वीज आंदोलनाला यश आले म्हणून तालुकाभर बॅनरबाजी करण्यात आली आहे. आंदोलन विजतोडणी संदर्भात होते तर माझ्या वर वैयक्तिक आरोप करण्याची काय गरज होती. माझ्या विरोधात टीका करताना काहीतरी मुद्दा काढून किंवा विरोधकांना कोणता मुद्दा सापडत नाही म्हणून आरोप करीत असतात असेही ते म्हणाले. इंदापूर विधानसभा निवडणुकीत काटी गावातून मला कमी मतदान झाले परंतु कदाचित काम करण्यास मी कमी पडलो असेल. त्यामुळे यापुढील निवडणुकीत विकास कामांना प्राधान्य दिले जाईल. त्यावेळी काटी गावातील नागरिकांनी योग्य निर्णय घेऊन मतदान करणे अपेक्षित असल्याचे राज्यमंत्री भरणे म्हणाले.