फलटण(वार्ताहर): जागतिक जल दिनानिमित्त व्हिडीओ मेकींग स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत फलटण एज्युकेशन सोसायटी संचलित, अभियांत्रिकी महाविद्यालयाची विद्यार्थिनी सानिया शफिक शेख हीने प्रथम क्रमांक पटकाविला तर दिक्षा गायकवाड हिने द्वितीय तर वृषभ शिंदे याने तृतीय क्रमांक पटकावला.
फलटण एज्युकेशन सोसायटी संचलित, अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या स्थापत्य अभियांत्रिकी विभाग आणि अल्ट्राटेक सिमेंट कंपनी यांच्या संयुक्त विद्यमाने महाविद्यालयामध्ये जागतिक जलदिन साजरा करण्यात आला होता.
या कार्यक्रमाचे औचित्य साधून महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमध्ये पाण्याचा सुयोग्य वापर तसेच यावर्षीच्या जलदीनाच्या ’भूजल – अदृश्य, दृश्य बनविणे’ या विषयाअंतर्गत व्हिडीयो मेकींग स्पर्धां व पाणी हेच जिवन या विषयावर पोस्टर प्रेझेंटेशन तसेच बांधकामविषयक एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.
अल्ट्राटेक सिमेंट कंपनीचे मनिष कासार कार्यशाळेत मार्गदर्शन करताना म्हणाले की, बांधकाम क्षेत्रामध्ये वापरल्या जाणार्या पारंपारिक पद्धतीमध्ये काळानुरूप बदल करायला हवा. तसेच त्यांनी बांधकाम क्षेत्रातील नवीन साहित्य व कंस्ट्रक्शन साईटवरती घेतल्या जाणार्या विविध साहित्य-चाचण्यांची उपस्थितांना ओळख करुन दिली.
वरील सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचा महाविद्यालयाचे प्राचार्य मिलिंद नातू यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. प्रथम वर्ष विभाग प्रमुख शांताराम काळेल यांनी महाविद्यालय व महाविद्यालयाच्या यशस्वी परंपरेची माहिती उपस्थितांना दिली.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक स्थापत्य अभियांत्रिकी विभाग प्रमुख सौ.धनश्री भोईटे यांनी केले. सूत्रसंचालन चंद्रकांत गोरड यांनी केले. तांत्रिक धुरा कुणाल चव्हाण यांनी सांभाळली तर शेवटी सौ.निलम ईंगळे यांनी आभार प्रदर्शन केले.
सदर स्पर्धेस विद्यार्थ्यांचा उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला होता. बांधकाम विषयक कार्यशाळेस फलटण परिसरातल्या कंत्राटदारांनी आवर्जून उपस्थिती लावली होती.
का साजरा केला जल दिन
पाणी हेच जीवन आहे. 30 वर्षापासून पाण्याचे महत्व पटवून देण्यासाठी हा जागतिक जल दिन साजरा केला जातो आज जलस्त्रोत बदलले असले तरी पाण्याचा अपव्यय हा सुरुच आहे. त्यामुळेच 21 व्या शतकातही पाण्याचे संकट हे सर्वांसमोरच आहे. पाण्यासंबंधीच्या आव्हानावर मात करण्यासाठी निसर्गाचा कसा उपयोग करुन घेता येईल याची संकल्पना या जागतिक जल दिनाच्या निमित्ताने सर्वांसमोर मांडली जाते. किमान यामधून का होईना पाण्याचे महत्व सर्वांच्या लक्षात येईल आणि पाण्याचा सदउपयोग केला जाईल. पिण्यायोग्य पाण्याचे निसर्गातील प्रमाण हे अत्यंल्प आहे. त्याचा जपून वापर करणे हीच काळाची गरज आहे. एवढेच नाही तर पाणी टंचाई आणि पाण्याचा अपव्यय असाच झाला तर तिसरे युध्द हे देखील पाण्यासाठीच होईल अशी भविष्यवाणी वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे पाण्याचे महत्व प्रत्येकाला पटवून देण्यासाठी हा 22 मार्च जागतिक जल दिन म्हणून साजरा केला जातो. या निमित्ताने जनजागृतीचे कार्यक्रमही राबवले जातात.