पुणे(वार्ताहर): क्रांतीज्योती सावित्रीबाईंनी मुलींच्या शिक्षणाची कवाडं उघडली नसती तर त्या अधिकारापासून वंचित राहिल्या असत्या असे प्रतिपादन माजी आमदार कमल ढोले-पाटील यांनी केले.
डॉन बॉस्को सुरक्षा संस्थेच्या वतीने आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त विविध क्षेत्रात प्रभावी कामगिरी करणार्या महिलांना नारी शक्ती सन्मान पुरस्काराने गौरविण्यात आले. यावेळी ते बोलत होते.
कार्यक्रमाला संस्थेचे रेक्टार फादर इयान डॉल्टन, माजी आमदार कमलनाणी ढोले- पाटील, डॉन बॉस्को सुरक्षाच्या प्रोजेक्ट मॅनेजर तेहसीन शेख, प्रीति कांबळे, मेघना शर्मा, गौरी जाधव, ऍड.वैशाली चांदणे, सुवर्णा नडगम, वृषालीताई रणधीर, फादर अओस्बन फुर्तडो, प्राची मानकर, सिद्धार्थ पंड़ागले, रवींद्र देशमुख उपस्थित होते.
पुढे बोलताना ढोले-पाटील म्हणाल्या की, सावित्रीबाईंनी शिक्षणाची कवाडं उघडली नसती तर मी या व्यासपीठावर बोलूच शकले नसते. माझ्या मते भगिणी खुर्चीवर बसू शकल्या नसत्या. चार भीतींच्या आत आणि मुलंबाळं याशिवाय महिलांना कोणतेही अधिकार नव्हते. पण सावित्रीबाईंनी अधिकार मिळवून दिले. त्यामुळे सावित्रीबाईच आपल्या खर्या माता असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
आदर्श महिला घडविण्याचं काम महिलांच्या हाती असून महिलांनी अन्यायाविरुद्ध उभे राहिले पाहिजे, असे मत दलित पँथरचे राष्ट्रीय अध्यक्ष यशवंत नडगम यांनी व्यक्त केले.
डॉन बॉस्को सुरक्षाच्या प्रोजेक्ट मॅनेजर तेहसीन शेख मनोगत व्यक्त करताना म्हणाल्या की, छत्रपती शिवाजी महाराजांनी रयतेच राज्य निर्माण केले. मात्र स्वराज्य हा विचारच राजमाता जिजाऊंचा होता. सवित्रीबाई फुलेंनी स्त्रीशक्तीच्या शिक्षणाची मूहुर्तपेढ रोवली. त्यातून कित्येक पिढ्या घडतायत. तर भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या संविधानामागे माता रमाई यांचा प्रचंड त्याग होता. त्या त्यागातून संविधानाची निर्मिती झाली. महिलांमध्ये असलेली आदिम शक्ती यातून स्पष्ट होते. त्यामुळे मुळातच शक्तीशाली असलेल्या महिलांना मदतीची नव्हे तर प्रोत्साहनाची गरज असते, असेही त्या म्हणाल्या.
यावेळी उपस्थित 500 महिलांना यशवंत नडगम यांच्या वतीने 500 किराणा किट देण्यात आले.
सात महिलांचा सन्मान
या कार्यक्रमात सात महिलांचा सन्मान करण्यात आला. यामध्ये शिवानी पांढरे (पत्रकार), जयश्री पेहरे (क्रीडापटू), भाग्यश्री मोरे (दिव्यांग सेवाकार्य), डॉ. निखिल श्रॉफ (आरोग्य), वृषाली काटे (उद्योजिका), आयरिन पटोळे (शिक्षण), सविता कांबळे (समाजिक कार्य) यांना प्रमाणपत्र व चषक देऊन सन्मानित कऱण्यात आले.