बारामती(वार्ताहर): समाजातील प्रत्येक गरीब, वंचित व दुर्बल घटकांना न्याय मिळवून देणार असे प्रतिपादन नॅशनल दलित मुव्हमेंट फॉर जस्टीस (एन.डी.एम.जे) चे राज्य सचिव वैभवजी गिते यांनी केले.
सातारा जिल्ह्यातील जातीय अत्याचारात उद्वस्त खून प्रकरणातील सहा कुटुंबांना शासकीय नोकरी लावल्याबद्दल वैभवजी गिते यांचा होलार समाजाच्या वतीने बारामती पाटस रोड येथील शासकीय विश्रामगृह येथे भव्य सत्काराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते.
याप्रसंगी ऍड अमोल सोनवणे यांची उस्मानाबाद जिल्ह्यातील जळीत हत्याकांड प्रकरणात विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती झाल्याबद्दल, बारामती वकील संघटनेचे उपाध्यक्षपदी ऍड. राजकिरण शिंदे यांची निवड झाल्याबद्दल तसेच ऍड.बापूसाहेब शिलवंत यांनी अनेक गोरगरिबांना न्याय मिळवून दिल्याबद्दल त्यांचा देखील होलार समाजाच्या वतीने विशेष सत्कार करण्यात आला.
या प्रसंगी बारामती, इंदापूर, दौंड, फलटण, वालचंदनगर, नातेपुते, अकलूज, माळशिरस, पंढरपूर येथील होलार समाजातील पदाधिकारी कार्यकर्ते तसेच पत्रकार बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पत्रकार सुरज देवकाते यांनी केले. तर आभार सेवक अहिवळे यांनी मानले.