अशोक घोडके यांजकडून…
इंदापूर(वार्ताहर): भाजप नेते रावसाहेब दानवेंनी माफी न मागितल्यास जालन्यात त्यांच्या घरासमोर संपूर्ण नाभिक समाज मुंडन करून केस दान करणार असल्याचे तीव्र शब्दांत इंदापूरात नाभिक समाजाचा मोर्चात पुणेजिल्हा नाभिक महामंडळाचे अध्यक्ष रमेश राऊत यांनी तीव्र शब्दात रोष व्यक्त केला.
राज्यातील महाविकास आघाडी सरकारवर टीका करत असताना भाजप नेते तथा केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी नाभिक समाजाबद्दल अपमानजनक वक्तव्य केल्याचा निषेधार्थ सोमवारी (दि.14) समस्त नाभिक समाजाच्या वतीने दानवेंचा निषेध करून इंदापूर प्रशासकीय भवनावर मोर्चा काढण्यात आला.यावेळी तहसीलदार श्रीकांत पाटील यांना निवेदन देण्यात आले.
पुढे बोलताना राऊत म्हणाले की, दानवे यांनी जे अक्षेपार्ह वक्तव्य केले ते निंदनीय आहे. त्यामुळे संपूर्ण भारतातील नाभिक समाजाचा अपमान झालेला आहे. त्यामुळे सर्व नाभिक समाज पेटून उठून रस्त्यावर उतरलेला आहे. मुंडन आंदोलन करुन देखील माफी मागितली नाही तर महाराष्ट्रासह देशात तीव्र स्वरुपाचे आंदोलन करण्यात येईल असेही त्यांनी यावेळी सांगितले.
प्रसंगी बोलताना बहुजन मुक्ती पार्टीचे राष्ट्रीय महासचिव ऍड.राहुल मखरे म्हणाले की, या जातीवादी मानसिकतेच्या लोकांना उघडे पाडून सर्व बहुजन समाजाने एकत्र आले पाहिजे. जातीवादी भूमिकेच्या विरोधामध्ये मी कायम समाजाच्या बरोबर आहे.
इंदापूर शहर नाभिक संघटनेचे अध्यक्ष संतोष क्षीरसागर याप्रसंगी म्हणाले की, केंद्रात भाजपची सत्ता असल्याने त्यांना माज आहे. या अगोदर देखील दानवे यांनी शेतकर्यांविषयी बोलताना साले म्हणून उल्लेख केला होता.ते नेहमी भावना दुखवतील अशी वक्तव्य करत असतात त्यामुळे त्यांनी राजीनामा द्यावा.
यावेळी महाराष्ट्र नाभिक महामंडळाचे इंदापूर तालुकाध्यक्ष अवधूत पवार, तालुक्याचे युवक अध्यक्ष पंकज सूर्यवंशी, उपाध्यक्ष वैभव सुर्यवंशी, कालिदास राऊत, राजेंद्र क्षीरसागर,माऊली जगताप, आनंद जाधव, राजेंद्र राऊत, राहुल काळे, शंकर काशीद,संतोष जगताप, दादा शिंदे,राजेंद्र शिंदे आदींसह शेकडोंच्या संख्येने नाभिक बांधव उपस्थित होते.