अशोक घोडके यांजकडून…
इंदापूर(वार्ताहर): पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नेतृत्वाखाली शेतकर्यांसाठी पंतप्रधान किसान सन्मान योजना व इतर लोकहिताच्या योजनांमुळे 4 राज्यात दैदिप्यमान मिळविलेल्या यशामुळे भाजपावरील विश्र्वासावर जनतेने शिक्कामोर्तब केला असल्याचे भाजप नेते व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी प्रतिक्रीया व्यक्त केली.
देशातील 5 राज्यांपैकी उत्तर प्रदेश, उत्तराखंड, मणिपूर व गोव्यामध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपने मिळविलेल्या यशाच्या प्रसंगी ते बोलत होते.
ते पुढे म्हणाले की, या 4 राज्यात भाजपला जनतेने एकतर्फी कौल घेऊन पुन्हा सत्ता दिली आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, पक्षाध्यक्ष डॉ. जे.पी.नड्डा, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या नेतृत्वावरती व भाजपच्या ध्येय धोरणावर जनतेने विश्वास व्यक्त केल्याचे स्पष्टपणे यातून दिसून येत आहे. शेतकरी, महिला, युवक वर्ग, गोरगरीब जनता, कामगार वर्ग व तळागाळातील सर्वसामान्य माणसाचे हित डोळ्यासमोर ठेवून’ सबका साथ सबका विकास ’ या सूत्रानुसार भाजपने सत्ता राबविली. त्याचेच फलित म्हणून जनतेने पुन्हा भाजपला भरभरून यश दिले आहे, असे हर्षवर्धन पाटील यांनी सांगितले.

ते पुढे म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नेतृत्वाखालील भाजप सरकारने देशातील शेतकर्यांसाठीच्या पंतप्रधान किसान सन्मान योजने सारख्या विकासाभिमुख विविध योजनांमुळे व निवडणूक झालेल्या राज्यातील भाजपा सरकारने राबवलेल्या लोकहिताच्या योजनांमुळे फक्त भारतीय जनता पार्टीच आपला विकास करू शकते, हा दृढ विश्वास सर्वसामान्य जनतेच्या मनामध्ये निर्माण झाला आहे. हा विश्वास वाढविण्याचे काम भाजप पदाधिकारी व कार्यकर्ते सातत्याने करीत आहेत. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नेतृत्वाखाली भारताचा जगात दबदबा असल्याचे रशिया-युक्रेन युद्धा दरम्यान जनतेच्या लक्षात आले आहे. त्यामुळे नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारवर देशातील जनता खूश आहे. या निकालातून जनतेने केंद्र सरकारला समर्थन दिले आहे, असेही हर्षवर्धन पाटील यांनी सांगितले.
पंजाब राज्यामध्ये कॉंग्रेस पक्ष सत्तेवर होता, कॉंग्रेसने पंजाब राज्य गमावले हा त्या पक्षाला मोठा धक्का आहे असे त्यांनी स्पष्ट केले. महाराष्ट्रात माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या नेतृत्वाखाली भाजपचा जनाधार वाढत असल्याचे यावेळी हर्षवर्धन पाटील यांनी नमूद केले.