हर्षवर्धन पाटील आपण मोटार सायकलवर फिरत होता त्यावेळी भरणे कुटुंबियांकडे 700 एकर शेती होती त्यामुळे कमिशनची भाषा करू नये : राष्ट्रवादीचा घणाघाती आरोप

अशोक घोडके यांजकडून…
इंदापूर(वार्ताहर): ज्यावेळी हर्षवर्धन पाटील आपण मोटार सायकलवर फिरत होता, त्यावेळी याच भरणे कुटुंबियांकडे 700 एकर शेती होती त्यामुळे तुमच्या तोंडून कमिशनची भाषा करू नये असा घणाघाती आरोप इंदापूर तालुका राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाने पत्रकार परिषद घेऊन केला आहे.

हर्षवर्धन पाटील यांनी वीज तोडणी संदर्भात रस्ता रोको आंदोलन केले होते तेव्हा त्या आंदोलनात त्यांनी राज्यमंत्री दत्तात्रय भरणे कमिशन एजंट आहेत असा उल्लेख केल्याच्या निषेधार्थ इंदापूर तालुका राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे अध्यक्ष हनुमंत कोकाटे यांच्या मार्गदर्शनाखाली 10 मार्च रोजी पत्रकार परिषद घेऊन हर्षवर्धन पाटील यांच्या विरोधात आक्रमक भूमिका घेत जोरदार टीकास्त्र सोडले.

यावेळी अतुल झगडे, सतीश पांढरे, नवनाथ रुपनवर, नानासाहेब नरूटे, रमेश पाटील, संजय देवकर, प्रफुल पवार, अक्षय कोकाटे, नानासो भोईटे रमेश पाटील, दत्तात्रय मोरे, दत्ता बाबर, मारुती वाघमोडे उपस्थित होते.

पत्रकार परिषदेत पदाधिकारी बोलताना म्हणाले की, सलग 20 वर्ष हर्षवर्धन पाटलांनी मंत्रीपदे भोगली. एच.डी.मोटार सायकल पासूनचा आपला प्रवास आज बी.एम. डब्ल्यू, इंडिवर अशा अनेक गाडया आपल्याकडे कुठून आल्या. एकेकाळी एच.डी.गाडीला रॉकेल नसलेले सुध्दा या तालुक्यातील जनतेने पाहिले आहे. त्यामुळे तुमच्याच बुडाखाली अंधार असल्याने तुम्ही कमिशनची भाषा करू नये.

आपण तालुक्यातील सुसंस्कृत नेते स्वयंमघोषीत आहात. विकास कामांचा धसका घेतल्याने आपली जिभ घसरू लागली आहे. जुना इतिहास पाहिला असता, इंदापूर सहकारी साखर कारखाना अडचणीत होता. शंकरराव भाऊंच्या आदेशानुसार त्यांच्या शब्दाचा मान राखीत भरणे कुटुंबियांनी सुमारे 3 कोटी रूपयांची एफ.डी. कारखान्यात ठेवली. तरी तुम्ही विचारता एवढा पैसा आला कुठून?

राज्यमंत्री भरणेंची क्रियाशिलता दिसत नाही. तुमच्या 19 वर्षांच्या मंत्रीपदाच्या काळातील निष्क्रियता बघुनच जनेतेन तुम्हाला विधानसभेला सलग 2 वेळा घरी बसविले आहे. त्यामुळे निष्क्रियतेच्या गप्पा मारणे सोडा असेही यावेळी सांगितले. आपणच मान्य करता व लोकांना सांगता 1300 कोटी रूपयांची विकासकामे चालू आहेत. त्यामुळे चांगल्या कामाला गालबोट लावण्यापुर्वी विचार करा आणि आपली जिभेवर नियंत्रण ठेवा वायफळ बडबड करू नका. अन्यथा आपल्या प्रत्येक वक्तव्यांवर प्रत्येक वेळी जशास तसे उत्तर दिले जाईल. संपूर्ण तालुक्यासमोर आपली असणारी पात्रता काय आहे हे दाखवून देवू असा ही इशारा इंदापूर राष्ट्रवादीने दिला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!