अशोक घोडके यांजकडून…
इंदापूर(वार्ताहर): महाराष्ट्र शासन म्हणते ई-निविदा प्रक्रिया राबवत असताना जिओटॅगिंग ही अट टाकता येत नाही. इंदापूरचे गटविकास अधिकार्यांनी लेखी पत्रान्वये ग्रामपंचायतीस कळविले कोणत्या शासन निर्णयानुसार अट टाकत आहात याबाबत लेखी कळवावे तरी सुद्धा ग्रामपंचायत निमगाव केतकी मनमानी कारभार करीत असल्याचे सामाजिक कार्यकर्ते अमोल राऊत यांनी लेखी पत्राद्वारे कळविले आहे.
निमगाव केतकी ग्रामपंचायत यांच्याकडून आपल्या पदाचा गैरवापर करत काही लोकांकडून शासनाच्या नियमावलीचे उल्लंघन केलेले आहे. इंदापूरचे गट विकास अधिकारी यांनी दि.21 फेब्रुवारी 2022 रोजी ग्रामपंचायत निमगांव केतकी यांना कोणत्या शासन निर्णयानुसार जिओटॅगिंगची अट टाकत आहात याबाबत कार्यालयात कळवावे व अट टाकलेली मागील निविदा रद्द करून नव्याने निविदा काढणेबाबत आदेश देऊनही या आदेशाला निमगाव केतकी ग्रामपंचायतीने केराची टोपली दाखवली आहे.
महाराष्ट्र शासनाचे आदेश, इंदापूर गटविकास अधिकार्यांचे आदेशाचे उल्लंघन करणार्या ग्रामपंचायत निमगांव केतकीच्या विरोधात सामाजिक कार्यकर्ते अमोल राऊत दि.14 मार्च पासून आमरण उपोषण करणार असल्याचे निवेदन दिले आहे. ग्रामस्थांना या-ना त्या कारणाने वेठीस धरण्याचे राजकारण सुरू आहे.
काय आहे जिओटॅगिंग :-
जिओटॅगिंग म्हणजे विविध माध्यमांमध्ये जोडण्याची प्रक्रिया आहे. छायाचित्र किंवा व्हिडिओने डेटा घेतला जातो. या डेटामध्ये सहसा अक्षांश आणि रेखांश निर्देशांक असतात. त्यामध्ये उंची, बेअरिंग, अंतर, अचूकता डेटा आणि ठिकाणांची नावे आणि कदाचित कोणत्या वेळेला काढला आहे त्याचा शिक्का सुद्धा येतो.