बारामती(वार्ताहर): सततच्या लॉकडाऊनमुळे झोपडपट्टीत राहणार्या गरीब, कष्टकरी, अनुसूचित जाती जमातीतील नागरिकांना रोजगारापासून मुकावे लागले. वीजबिल माफ होईल या आशेवर या लोकांची थकबाकी झाली असल्याचे मत झोपडपट्टी सुरक्षा दलाचे राज्य संघटक तानाजी पाथरकर यांनी मांडले.
झोपडपट्टीत राहणार्या गरीब, कष्टकरी, अनुसूचित जाती जमातीतील नागरिकांची विज खंडीत केल्यास बारामतीच्या वीज वितरण कंपनीसमोर आंदोलन करण्यात येईल असा इशारा दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.
निवेदन देते समयी ज्येष्ठ नेते अशोक सावंत, युवा नेते सुरज देवकाते इ. उपस्थित होते.
वीज कंपनी थकबाकीच्या नावाखाली वीज खंडीत करण्याचा सपाटा लावलेला आहे. मार्चअखेरीस याचा जास्त फटका झोपडपट्टी वासीयांना होणार आहे. कोरोना काळात अनेकांचे हातचे काम गेले, कित्येकांना रोजगारापासून मुकावे लागले. हातावरचे पोट असणारे मोलमजुरी करून खाणारे लोक, वीजबिल कमी होईल अथवा माफ होईल या आशेवर बिलाची थकबाकी झाली. सततच्या लॉकडाऊनमुळे हातचे काम गेल्याने वीजबिल भरले नाही. त्यामुळे बिलात थकबाकी दिसत आहे.
सर्वत्र कोरोनाचा प्रार्दुभाव कमी झाला असला तरी पाहिजे तसा रोजगार उपलब्ध झालेला नाही. थकबाकीचे प्रमाण पाहिले असता 2 ते 5 हजारापर्यंत आहे. तरी सुद्धा वीज कर्मचारी वीज खंडीत करीत आहेत.