राज्यपालांच्या वक्तव्यांवरून राष्ट्रवादीच्यावतीने निषेध

बारामती(वार्ताहर): राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्याचा राष्ट्रवादी कॉंग्रेस बारामती तालुका व शहराच्या वतीने बारामती तहसील कार्यालय याठिकाणी जाहीर निषेध नोंदवून नायब तहसीलदार महादेवराव भोसले यांना निषेधाचे निवेदन देण्यात आले.

महाराजा, चक्रवर्ती सगळे झाले. चाणाक्याशिवाय चंद्रगुप्ताला कोण विचारेल, समर्थांशिवाय शिवाजीला कोण विचारेल? मी शिवाजी किंवा चंद्रगुप्त यांना लहान दाखवत नाही. प्रत्येकाच्या मागे आईचं मोठं योगदान असतं, तसंच आपल्या समाजात गुरूचं मोठं स्थान असतं. शिवाजी महाराजांनी समर्थांना म्हटलं की तुमच्या कृपेने मला राज्य मिळालं आहे, असे वक्तव्य राज्यपाल कोश्यारी यांनी केले होते.

मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने 16 जुलै 2018 रोजी दिलेल्या निकालानुसार तपास अधिकार्‍यांनी व इतिहास तज्ञ आणि इतर अभ्यासकांची मते विचारात घेतल्यानंतर न्यायालयात सादर केलेल्या पुराव्यानुसार छत्रपती शिवाजी महाराज आणि समर्थ रामदास यांची भेट झाल्याचा कोणताही पुरावा आढळला नाही. शिवाजी महाराज आणि रामदास यांच्यामध्ये गुरू-शिष्याचे नाते असल्याचे देखील कोणताही पुरावा उपलब्ध नाही असे असताना देखील राज्यपाल कोश्यारी यांनी आक्षेपार्ह व समाज भावना दुखावणारे वक्तव्य केल्याबद्दल संपूर्ण राज्यात तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.

यावेळी बारामती शहराध्यक्ष इम्तियाज शिकीलकर, राहुल वाबळे, अमर धुमाळ, साधु बल्लाळ, विशाल जाधव, ऍड.रवींद्र माने, वनिता बनकर, अनिता गायकवाड, सुनिल बनसोडे, आरती शेंडगे, भाग्यश्री धायगुडे, पैगंबर शेख, सुनिता मोटे, रेहाना शेख, राजेश वाघ आदींसह महिला व युवक कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!