अल्पसंख्यांक मंत्री यांच्यावर ईडीने कारवाई केली. जगप्रसिद्ध कुख्यात गुंड दाऊद व त्याच्या कुटुंबियांशी आर्थिक व्यवहार असल्याचे आरोप करण्यात येत आहे. आज राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आहे. या सरकारमधील अल्पसंख्यांक मंत्री अशा कृत्यात सापडल्याने सर्वत्र चर्चेचा विषय बनला आहे. आज हे मंत्री आहेत त्यामुळे प्रत्येक जिल्हा व तालुक्यात ईडीचा केंद्र सरकारचा निषेध होत आहे. पक्षाचे लोंढेच्या लोंढे रस्त्यावर उतरून निषेध व्यक्त करीत आहेत.
असो, मात्र हे कृत्य अनावधानाने किंवा नजरचुकीने एखाद्या गावात,वाडीत वस्तीत एखाद्या मुस्लीम कार्यकर्त्याकडून झाले असते तर हेच सरकार, हेच पक्ष व पक्षातील कार्यकर्ते रस्त्यावर आले असते का? हा प्रश्र्न सर्वसामान्य भारतीय मुस्लिमांना पडलेला आहे. आरोप करणे खूप सोपे असते मात्र, आरोप केल्यानंतर त्या कुटुंबाला व कुटुंबातील व्यक्तीला आत्महत्या करण्यापलीकडे काहीच उरत नाही.
कित्येक वेळा अनावधानाने किंवा नजरचुकीने एखाद्या संस्थेत, पक्ष कार्यालयात 15 ऑगस्ट, 26 जानेवारी इ. वेळी झेंडावंदन करताना झेंडा उलटा फडकला जातो. त्यावेळी विरोधक किंवा देशभक्त संबंधितावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा, झेंडासंहितेनुसार कारवाई करा असा जोर धरीत असतात. मग नवाब मलिक जर कुख्यात गुंडाच्या कुटुंबियाच्या संपर्कात किंवा त्यांच्याशी आर्थिक लागेबांधे करीत असतील तर त्यांच्यावर कारवाई होणे क्रमप्राप्त आहे.
प्रत्येकाला आपल्या समाजाचा, धर्माचा अभिमान असलाच पाहिजे. भारतीय घटना व संस्कृतीने आपल्याला समान हक्क व अधिकार दिला आहे. कित्येक वेळा गाव,वाडी वस्तीत एखाद्या मुस्लिम समाजाच्या कुटुंबातील व्यक्तीने घरावर कार्यक्रमा निमित्त हिरवा झेंडा लावला असता, त्याच घरासमोरील घरावर लगेच मोठालठ्ठ झेंडा लावला जातो असे का? त्याच घरातील व्यक्तीने अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा आधार घेत एखादे देशविघातक कृत्य केल्यास त्या कुटुंबासह त्याच्या पै-पाहुण्यांसह समाजाला सुद्धा वाळीत टाकले जाते. त्यांच्याशी कोणताही व्यवहार केला जात नाही. मग मंत्री आहे म्हणून सर्वांनी रस्त्यावर उतरून निदर्शने करायची, घोषणा द्यायच्या का? मग गावाकडील एखाद्या कुटुंबाकडून घडलेल्या कृत्यासाठी रस्त्यावर नव्हे तर ते कुटुंब रस्त्यावर येऊन नेस्तनाबुत कधी होईल याकडे जास्तीचे लक्ष असते. त्यामुळे प्रत्येकाने विचार सरणी बदलण्याची गरज आहे.
पक्ष आज आहे उद्या नाही. धर्म आज आहे उद्या नाही मात्र माणुसकी कायम तुमच्या बरोबर आहे हे विसरता कामा नये. विशिष्ठ समाजाचा व्यक्ती गैरकृत्यात सापडला म्हणून सर्व समाज नालायक असतो असे नाही. केंद्र व राज्य समविचारी सरकार असते तर आज वेगवेगळे आंदोलन, उपोषण पहावयास मिळाले नसते. एखाद्या मंत्र्याने भ्रष्टाचार केला, देश विघातक गैरकृत्य केले तरी त्यास सांभाळून घेतले असते कारण त्याठिकाणी कोणतीही जात, पात, धर्म, वंश, भेदभाव येत नसून फक्त आणि फक्त राजकारण येत असते. राजकारणापायी ही मंडळी काहीही करू शकतात हे कोणालाही पहावयास मिळाले नसेल असे नाही.
गाव,वाडी, वस्तीत जर एखादा मलिक सापडला तर त्यासाठी सुद्धा विविध पक्ष, संस्था, संघटनांनी तो निर्दोष होईपर्यंत रस्त्यावर उतरले पाहिजे. फक्त मंत्री, नेत्यांसाठी नव्हे. जर असेच चालत राहिले तर मोठा आणखीन मोठा, लहान आणखीन लहान होत जाईल. त्यामुळे नवाब मलिकांची संपूर्ण चौकशी अंती सरकार व सरकारमधील घटक पक्षांनी निर्णय घेण्याची गरज होती.
केंद्रात ओवेसी बंधू भारतीय घटनेनुसार स्पष्टपणे बोलत असतात काहींच्या ते जिव्हारी सुद्धा लागते. त्यावेळी इतर राजकीय मंडळी या ओवीसी बंधूंकडे देशद्रोही, आतकंवादी, अत्याचारी असल्याच्या नजरेतून पाहत असतात आणि त्यांच्या पक्षात, संघटनेत काम करणार्यांना सुद्धा तशीच वागणूक देतात. त्यामुळे येणार्या काळात नागरीकांनी मनात देशप्रेम बाळगला पाहिजे. राजकीय मंडळींच्या चष्म्याने न पाहता स्वत:च्या नजरेतून पाहुन तुमच्या मनातील उच्च विचार, चांगले विचार इतरांबाबत निर्माण करा. तरच आपण एकत्र नांदू शकू व परकीय आरोप-प्रत्यारोपाला सामुहिकपणे विरोध करू शकू. अन्यथा राजकीय मंडळी तुम्हाला आपापसात भांडत ठेवेल व संपूर्ण देश जातीपातीने पोखरून निघेल.