बारामती(वार्ताहर): मराठी राजभाषा दिनानिमित्त गेल्या 30 वर्षापासून मराठी विषयाचे शिक्षण देणारे रयत शिक्षण संस्था डोर्लेवाडीचे मुख्याध्यापक एस.पी. साळवे यांचा महाराष्ट्र नवनिर्माण सेना पुणे जिल्हा अध्यक्ष ऍड. विनोद जावळे यांचे शुभहस्ते पुष्पगुच्छ, शाल व श्रीफळ देऊन यथोचित सत्कार करण्यात आला.
ज्येष्ठ कवी वि.वा. शिरवाडकर अर्थात कुसुमाग्रज यांचा 27 फेब्रुवारी हा जन्मदिवस ’मराठी भाषा गौरव दिन’ म्हणून सर्वत्र साजरा केला जातो. या दिनाचे औचित्य साधुन मनसेच्या वतीने कार्यक्रम घेण्यात आला.
मराठी भाषेची गौरवशाली परंपरा जपण्यासाठी आणि तिचे संवर्धन करण्यासाठी व युवापिढीच्या मना मनात रुजवण्यात साळवे सरांचा मोलाचा वाटा आहे. यापुढेही मराठी भाषा शिकवण्याचे पवित्र कार्य त्यांच्या हातून घडोत अशा शुभेच्छा ऍड.जावळे यांनी दिल्या व मराठी भाषेचे महत्व समजावून सांगितले. मराठी भाषेविषयी सखोल माहिती देत मोलाचे मार्गदर्शन साळवे सरांनी केले.
यावेळी मनसे महिला तालुकाध्यक्षा सपना शिंदे, शहर उपाध्यक्ष चंद्रकांत भोसले, तालुका उपाध्यक्ष संग्राम चांदगुडे, तालुका संघटक निलेश कदम, महेश सर, श्रीकांत रोकडे, श्री.शिंदे इ. उपस्थित होते.