मुनीर तांबोळींच्या अथक प्रयत्नातून व तांबोळी समाजाच्या पुढाकाराने छत्र हरविलेल्या कुटुंबाचे पालकत्व स्वीकारले

बारामती(वार्ताहर): एका मनोविकृत व्यक्तीच्या हल्ल्यात मृत्यू झालेल्या भाजी विक्रेते फारूखचाचा तांबोळी यांच्या मोठ्या मुलीच्या लग्नाचा खर्च सामाजिक जाणीव ठेवत अंजुमन इत्तेहाद जमात बारामतीच्या वतीने लोकसहभागातून करण्यात आला.

भाजीविक्रेते फारूकचाचा यांच्या पश्र्चात पत्नी, तीन मुली, लहान मुलगा असा परिवार आहे. एकमेव करता कमवता आधार अचानक सोडून गेला. हे दु:ख कधीही भरून न येणारे आहे. या सर्व दु:खाची जाणीव ठेवत, समाजात आजही माणुसकी टिकून आहे याचे उत्तम उदाहरण म्हणजे या कुटुंबाच्या पाठीशी समस्त सर्व जागरुक मानवतावादी नागरिक व समाज बांधव उभे राहिले.

फारूक यांची मोठी मुलगी तब्बसुम हिचा विवाह म्हस्कोबाची वाडी येथील मुलगा समीर याच्याशी ठरला, घरात करता माणूस नसल्याची उणीव-जाणवत असताना अंजुमन इत्तेहाद जमात बारामतीच्या वतीने लोकसहभागातून विवाह सोहळाचा सर्व खर्च उचलत हा विवाह पार पाडला.

या विवाह सोहळ्यासाठी उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश इंगळे हे उपस्थित राहुन दोन्ही दांपत्यांना शुभाशिर्वाद दिले व मोलाचे मार्गदर्शन केले.

या विवाह सोहळ्यासाठी पिंपरी-चिंचवड तांबोळी जमात अध्यक्ष ताज्जुदीन तांबोळी व पदाधिकार्‍यांच्या वतीने विस हजार रूपयांची मदत केली. तांबोळी जमात पुणे शहर अध्यक्ष नजीरभाई धायरीवाले यांनी दुसर्‍या मुलीच्या शिक्षणासाठी पंचवीस हजार रुपये रोख मदत दिली.

या सोहळ्यासाठी सर्व नियोजन पुढाकार घेऊन बारामती तांबोळी समाज अध्यक्ष मुनीर तांबोळी यांच्यासह कार्यकारिणी सदस्य जावेद तांबोळी, बशीर तांबोळी, अफजल तांबोळी, युसुफ तांबोळी, इम्रान तांबोळी, असलम तांबोळी, जाहगींर तांबोळी, आरीफ तांबोळी, तोसीब तांबोळी, अरबाज तांबोळी यांच्यासह जेष्ठ मार्गदर्शक, मस्जिदभाई तांबोळी, कबीरभाई तांबोळी, रशिदभाई तांबोळी,राजुभाई तांबोळी, रमजान भाई तांबोळी यांच्यासह विविध सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थिती लावून परिश्रम घेऊन हा विवाह सोहळा पार पाडला.

कोरोना काळात पालकत्व हरविलेल्यांसाठी शेकडो हात पुढे येतील, सरकार मदत करेल. मात्र, एका मनोविकृत व्यक्तीच्या हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्या निष्पाप फारूखचाचासाठी तांबोळी समाज, समाजातील दानशूर व्यक्ती व विशेषत: सामाजिक क्षेत्रात उल्लेखनिय कार्य करणारे मुनीर तांबोळी पुढे आले. समाजाला मदतीची हाक दिली समाजातील दानशूर व्यक्तींनी सुद्धा कोणताही विचार न करता सढळ हाताने मदत केली. फारूखचाचा च्या मोठ्या मुलीचे लग्न लावून दिले. दुसर्‍या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी स्विकारली आर्थिक मदत केली. हेच खरं समाजाचं आपण देणं लागतो म्हणतात ते हेच… नाहीतर कित्येक संस्थेत पदे घेऊन मिरवणारी सापडतील.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!