शारदानागर(वार्ताहर): स्त्रीयांवर सततचे होणारे अन्याय व अत्याचाराचे प्रमाण कमी करण्यासाठी त्यांना स्वसंरक्षणाचे धडे देणे गरजेचे असल्याचे मत विद्यार्थी विकास मंडळाचे समन्वयक प्रा.आर.एस.लोहकरे यांनी व्यक्त केले.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या निर्भय कन्या अभियान योजनेअंतर्गत विद्यार्थी कल्याण मंडळ व राष्ट्रीय सेवा योजना यांच्या संयुक्त विद्यमाने, एक दिवसीय कराटे स्वसंरक्षण प्रशिक्षण शिबिराचे उद्घाटन प्रसंगी प्रास्ताविकात प्रा.लोहकरे बोलत होते.
पुढे लोहोकरे म्हणाले की, अचानक एखाद्या महिलेवर चोरीच्या उद्देशाने किंवा इतर कोणत्याही उद्देशाने हल्ला झाला तर तो तिला सक्षमपणे परतवता आला पाहिजे. यासाठी महाविद्यालय स्तरावर अशा प्रकारच्या प्रशिक्षणाची नितांत गरज आहे.
शिबिर सुरू करण्यापूर्वी विद्यार्थ्यांचा फिटनेसची माहिती घेऊन प्रवेश देण्यात आला.
उद्घाटन कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ.ए.आर.मुंगी कार्यक्रम अधिकारी, राष्ट्रीय सेवा योजना यांनी केले.
प्रशिक्षक मिननाथ भोकरे यांनी कराटेची सुरुवात व कराटेच्या माध्यमातून प्रतिकूल परिस्थितीत आपण आपला स्वतःचा जीव वाचू शकतो हे सविस्तर सांगितले. उभे राहून, बसून कशाप्रकारे दुसर्यावर हल्ला करता येऊ शकेल हे छोट्या छोट्या गोष्टी त्यांनी प्रात्यक्षिकातून दाखवून दिले व विद्यार्थ्यांकडून करून घेतले.
प्रात्यक्षिकानंतर कु.पूजा सस्ते, कु.सारिका तोरसकर, कु.प्रीती महागुळे या विद्यार्थिनींनी शिबिरात आलेले अनुभव व या प्रात्यक्षिकांचा भविष्यात आम्हाला खूप उपयोग होईल असे मनोगत व्यक्त केले.
समारोप समारंभाच्या वेळी राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी व सर्व सदस्य उपस्थित होते. सदर शिबिरासाठी महाविद्यालयातील 200 विद्यार्थिनी उपस्थित होत्या. या शिबिराचे प्रा.आर.एस.लोहकरे व राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी डॉ.ए.आर.मुंगी यांनी समन्वयक म्हणून काम पाहिले. सदर शिबिर यशस्वी होण्यासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.एस.जे. साठे यांनी मार्गदर्शन केले.
या शिबिरासाठी कराटे प्रशिक्षक वास्का कराटे असोसिएशन इंडियाचे अध्यक्ष , महाराष्ट्र सेकोकाई कराटेचे सचिव व कराटे क्लब बारामतीचे संस्थापक मास्टर शियान मिननाथ भोकरे, कु.मंथन भोकरे व अनिकेत जवळेकर यांनीही प्रात्यक्षिकांच्या माध्यमातून विद्यार्थिनींना मोलाचे मार्गदर्शन केले. सदरचे शिबीर आप्पासाहेब पवार सभागृहाच्या समोरील खुल्या आवारात घेण्यात आले.