तरूणांनी शिवरायांच्या खर्‍या इतिहासाचा अभ्यास करावा, शिवराय हे संबंध महाराष्ट्राचे गौरवशाली राजे होते – ऍड.राहुल मखरे

अशोक घोडके यांजकडून…
इंदापूर(वार्ताहर): तरूणांनी शिवरायांच्या खर्‍या इतिहासाचा अभ्यास करावा, शिवराय हे संबंध महाराष्ट्राचे गौरवशाली राजे असल्याचे मत जयंती कमिटीचे आयोजक व बहुजन मुक्ती पार्टीची राष्ट्रीय महासचिव ऍड.राहुल मखरे यांनी बोलताना व्यक्त केले.

सालाबादप्रमाणे डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव समिती ट्रस्टच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्याची मिरवणूक काढून 392 वी जयंती मोठ्या जल्लोषात साजरी करण्यात आली. यावेळी प्रास्ताविक करताना ऍड.मखरे बोलत होते.

पुढे मखरे म्हणाले की, जयंती कमिटी चे संस्थापक अध्यक्ष माझे वडील दिवंगत रत्नाकर मखरे (तात्या) यांनी शिवजयंतीची शहरांमध्ये परंपरा सुरू केली, त्यांनी सुरू केलेली परंपरा आम्ही अखंडपणे सुरू ठेवू. छत्रपती शिवाजी महाराज प्रत्येक पिढीला प्रेरणा देणारे बहुजनांचे राजे होते.

मिरवणुकी अगोदरच राज्याचे राज्यमंत्री ना. दत्तात्रय भरणे यांनी भिमाई आश्रमशाळेवर येऊन शिवरायांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून मानवंदना दिली. यावेळी सर्व विद्यार्थ्यांना शिवजयंतीच्या शुभेच्छा दिल्या.

शिवरायांच्या पुतळ्याचे पूजन इंदापूरच्या नगराध्यक्षा अंकिता शहा व पुणे जिल्हा बँकेचे संचालक अप्पासाहेब जगदाळे यांच्या हस्ते पूजन करून मानवंदना देण्यात आली. बुद्धविहार, आंबेडकरनगर येथून भव्य मिरवणुकीला प्रारंभ झाला. बँड,ढोल, ताशाच्या गजरात शिवजयंतीची मिरवणूक उत्साहपूर्वक वातावरणात निघाली. मिरवणुकीत तरुण वर्गासह महिलांचा सहभाग लक्षणीय होता. लहान बालके मावळे होऊन घोड्यावर स्वार झाले होते. शहराच्या नेहरू चौकात व मुख्य बाजारपेठेत शिवप्रेमींनी बँड,हलगी तुतारीच्या निनादात ठेका धरत नृत्य केले.(पोलिसांनीही ठेका धरत नृत्य केलं.त्यांनाही मोह आवरता आला नाही). शिवजयंतीचा उत्साह शिगेला पोहोचला होता, शिवप्रेमींचा जल्लोष लक्षवेधी ठरला. मिरवणूक हळू- हळू पुढे सरकत खडकपुर्‍यावरून मुख्य रस्त्यावरून नगरपालिका मैदानात समारोप झाला. मोहोळचे आमदार यशवंत माने यांनी छत्रपती शिवाजी महाराज व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यांना व इंदापूर शहरातील शिवजयंतीचे प्रणेते दिवंगत रत्नाकर मखरे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

यावेळी उपस्थित मान्यवरांचा छोटेखानी सत्कार पार पडला. इयत्ता दहावी व बारावीच्या बोर्ड परीक्षेत (सन-2021) प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचाही यावेळी जयंती कमिटीच्या वतीने सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र देऊन यथोचित सत्कार केला.

यावेळी ऍड.समीर टिळेकर, बारामती नगरपरिषदेचे माजी नगराध्यक्ष कैलास चव्हाण यांची भाषण भाषणं झाली. यावेळी मुकुंद शहा, डी.एन जगताप, महारुद्र पाटील, शुभम निंबाळकर, भारतदादा अहिवळे, वसंतराव साळवे, अंकुश सोनवणे, बाळासाहेब वाघमारे, अनिल अवसरमल, कैलास कदम, गजानन गवळी, गोपीचंद गलांडे, विलास शिंदे मधुकर जगताप,भास्कर साळवे, संग्राम भैलुमे, बाबजी भोंग, माऊली नाचण, हमीद आतार,बाळासाहेब सरवदे, हनुमंत कांबळे,अविनाश कोथमिरे, तानाजी धोत्रे, राजेंद्र हजारे, अश्वजीत कांबळे, शकुंतला मखरे (काकी), सुवर्णाताई मखरे आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी नगरपालिका मैदानात विद्रोही शिवशाहीर राजेंद्र कांबळे (खुडुसकर) यांचा शाहिरी जलसा कार्यक्रम पार पडला. शिवजयंतीचे नियोजन ऍड.समीर मखरे, गोरख तिकोटे यांनी केले. सूत्रसंचालन नानासाहेब सानप यांनी केले तर उपस्थितांचे आभार नानासाहेब चव्हाण यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!