अशोक घोडके यांजकडून…
इंदापूर(वार्ताहर): येथील काही राज्यकर्ते म्हणतात, आम्हाला माहिती नाही, संबंध नाही पण हे सर्व कोणी केलं हे जनतेला सांगण्याची गरज नाही असे माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी बोलताना सांगितले.
वकीलवस्ती येथे जलसंपदाच्या कार्यालयासमोर आज 10 गावातील शेतकर्यांनी हर्षवर्धन पाटील व अप्पासाहेब जगदाळे यांच्यासह एक दिवसीय धरणे व रास्ता रोको आंदोलनाप्रसंगी श्री.पाटील बोलत होते.
पुढे पाटील म्हणाले की, जलसंपदा विभागाने शेटफळ तलावातून लाभक्षेत्रामध्ये नसलेल्या 65 शेतकर्यांना उचल पाणी परवाने हे बेकायदेशीरपणे दिले आहेत. परिणामी, गेली 125 वर्षापासून पाणी मिळत असलेली लाभक्षेत्रातील 10 गावांमधील शेती उध्वस्त होणार आहे. केवळ राजकीय दबावापोटी जलसंपदा विभागाने उचल पाणी परवाने देण्याचा घेतलेला निर्णय तातडीने रद्द करावा.
या तलावातून शेटफळ हवेली, भोडणी, सुरवड, वकीलवस्ती, लाखेवाडी, बावडा, पिठेवाडी, निरनिमगाव, कचरवाडी (बा.), सराटी या 10 गावांमधील शेतीला पाणी मिळून हा परिसर सुजलाम सुफलाम झाला आहे. मात्र राज्यकर्त्यांनी नियम धाब्यावर बसवून तलावातून 65 शेतकर्यांना बेकायदेशीरपणे उचल पाणी परवाना दिला आहे. महाराष्ट्र जलसंपत्ती प्राधिकरणाच्या लवादाकडे यासंदर्भातील अपील प्रलंबित असताना, सगळे नियम धाब्यावर बसून राजकीय दबावाने जलसंपदाने तलावाचे भराव फोडून उचल पाणी परवाने देण्याचा घेतलेला निर्णय बेकायदेशीर आहे. या निर्णयाविरोधात लाभक्षेत्रातील पाणीपुरवठा संस्थांच्या वतीने महादेव घाडगे यांच्या पाणी पुरवठा संस्थेने काल बुधवारी ( दि.16) मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे, अशी माहिती हर्षवर्धन पाटील यांनी दिली. शेटफळ तलावातील पाण्यावरती लाभक्षेत्रातील 10 गावातील शेती, पाणीपुरवठा योजना, दुग्ध व्यवसाय अवलंबून आहे. त्यामुळे जलसंपदाने तात्काळ पाणी परवाने देण्याचा निर्णय रद्द करून, तलावाचे दारे क्र. 1 ते 23 वरील नऊ पाणी वापर संस्था कार्यान्वित करून पाणी द्यावे, अन्यथा लढा तीव्र केला जाईल असा इशाराही यावेळी हर्षवर्धन पाटील यांनी दिला.
तलावातून पाणी उपसा परवाने नियमबाह्य दिल्याने लाभक्षेत्रातील शेतीचे वाळवंट होण्यास वेळ लागणार नाही. त्यामुळे जलसंपदाच्या या अन्यायकारक निर्णयाविरोधात शेतकर्यांनी लढा देण्याचा निर्णय घेतल्याने शासनास हा चुकीचा निर्णय मागे घेणे शिवाय आता पर्याय राहणार नाही असे अप्पासाहेब जगदाळे यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले.
यावेळी जेष्ठ नेते अशोक घोगरे, पंडितराव पाटील, महादेव घाडगे यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी अजित टिळेकर, उदयसिंह पाटील, मयुरसिंह पाटील, विजय गायकवाड, अनिल पाटील, विजय घोगरे, प्रतापराव पाटील, धैर्यशील पाटील, शिवाजी हांगे, तुकाराम घोगरे, किरण पाटील, विकास पाटील, अभिजीत घोगरे, दादासाहेब घोगरे, सुरेश मेहेर, निलेश घोगरे, तानाजी नाईक, पवनराजे घोगरे, इन्नूस मुलाणी, काशिनाथ अनपट, माणिकराव खाडे, सदानंद कोरटकर, एच. के. चव्हाण, कैलास हांगे, के. एस. खाडे, विष्णू वाघमोडे आदीसह शेतकरी शेकडोंच्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सूर्यकांत फडतरे यांनी केले. यावेळी जलसंपदाच्या अधिकार्यांनी निवेदन स्वीकारले. दिवसभर वकीलवस्ती येथील जलसंपदाच्या कार्यालयासमोर शेतकर्यांनी धरणे आंदोलन केले. तर रास्ता रोको आंदोलन प्रसंगी वाहनांच्या दुतर्फा लांबच लांब रांगा लागल्या. शेटफळ उचल पाणीप्रश्नी 10 गावातील शेतकरी आक्रमक झाल्याचे आज दिसून आले.