अशोक घोडके यांजकडून…
इंदापूर (वार्ताहर): इंदापूर तालुक्यातील गोर-गरीब व सर्वसामान्य जनता डोळ्यासमोर ठेवून संपूर्ण तालुक्यात चौफेर विकासाची गंगा वाहत असल्याचे राज्यमंत्री, ना.दत्तात्रय भरणे यांची बोलताना व्यक्त केले.
दगडवाडी, पिटकेश्वर व निरवांगी येथील 30 कोटी 70 लक्ष रूपयांच्या विकासकामाचे भूमिपूजन व उद्घाटन समारंभाप्रसंगी ना.भरणे बोलत होते. यावेळी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे विविध पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पुढे भरणे म्हणाले की, जोपर्यंत साहेब, दादा व ताईंचा आशिर्वाद आणि गोर-गरीबांची साथ तोपर्यंत मला कोणाला भिण्याची गरज नाही. महागातील वाहनवाल्यापेक्षा माझ्याकडे सर्वसामान्य व गोर-गरीबांकडे असणारे वाहनवाले माझ्याबरोबर आहेत. पवार कुटुंबियांनी मला 2012 साली पुणे जिल्हा परिषदेचे अध्यक्षपदाची धुरा सांभाळण्याची जबाबदारी दिली. पदे मिरवण्यासाठी किंवा रूबाब करण्यासाठी नसतात. पदाचा वापर गोरगरीब व सर्वसामान्य माणूस केंद्रबिंदू मानून केला व करीत आलेलो आहे, ही शिकवण देशाचे नेते खा.शरदचंद्रजी पवार यांनी घालून दिली आहे. विकासात्मक काम करताना कधीही जाती-पातीचा, लांबचा व दूरचा किंवा इतर पक्षाचा असा भेदभाव केला नाही. प्रत्येक माणसाचे काम केले व त्यास मदत कशी व कशापद्धतीने करता येईल हे प्राधान्याने करीत आलेलो आहे. सर्वच कामे झाली असेही म्हणता येणार नाही. काम होणार असेल तर मी होकार देतो अन्यथा स्पष्ट शब्दात नकार देतो असेही ते म्हणाले. माझ्या राजकीय जीवनात खोटे आश्र्वासन दिले नाही. कोणाची फसवणूक केली नाही. काम करताना सत्याची कास धरून गोर-गरीब माणसाला न्याय देण्याचा प्रयत्न केला हीच खूप मोठी ताकद पाठीशी आहे असेही ते म्हणाले.