बारामती(वार्ताहर): आपला नगरसेवक भेटावा, दिसावा त्याने मतदारांची खुशाली विचारून सुख-दु:खात सहभागी व्हावे व एखाद दुसरं काम करावे यापलीकडे नगरसेवकांकडून नागरिकांच्या अपेक्षा नसतात. मात्र बारामती नगरपरिषदेतील काही नगरसेवक नागरीकांच्या अपेक्षांचा विसर पडलेला दिसत आहेत.

नगरसेवक सक्रिय असेल तर मतदारांच्याही अपेक्षा वाढतात. असाच प्रकार प्रभाग क्र.18 मध्ये मतदारांचा अपेक्षा भंग झाला. प्रभाग क्र.18 मधील सामाजिक कार्यकर्ते व राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे युवा कार्यकर्ते निलेश पलंगे यांनी 6 फेब्रुवारी 2022 रोजी आपल्या फेसबुक अकौंटवर टाकलेली पोस्ट चर्चेचा विषय ठरली आहे.
त्यांनी पोस्टमध्ये म्हटले आहे की, खाटीकगल्ली येथील काळोखे व पलंगे याच्या घरामागील बोळीत कचर्याचा ढिगच्या-ढिग साचला होता. येथील रहिवाशांना दुर्गंधीचा त्रास होत होता. याबाबत नगरपालिकेत स्वच्छता करणेबाबत वेळोवेळी विनंती सुद्धा केली होती. या प्रभाग क्र.18 मधून निवडून गेलेल्या नगरसेवकांनी सुद्धा पाहणी करून स्वच्छ करण्याचे आश्र्वासन दिले होते. मात्र स्वच्छता झालीच नाही.
श्री.पलंगे यांनी बारामती नगरपरिषदेचे कार्यक्षम बांधकाम सभापती सत्यव्रत काळे यांच्याशी संपर्क साधुन सदर प्रकाराबाबत माहिती दिली. त्यांनी तातडीने वेळ न दडवता नगरपरिषदेचे आरोग्य निरीक्षक राजेंद्र सोनवणे, सुभाष नारखेडे यांना प्रकार सांगून या दोघांनीही तत्परता दाखवीत सर्व आरोग्य विभागाच्या टीमने काही तासात स्वच्छता करून सदरची बोळ मोकळी केली.
बांधकाम सभापती, आरोग्य निरीक्षक व सर्व कर्मचारी टीमचे निलेश पलंगे यांनी मनापासून धन्यवाद मानले.
नगरपरिषदेचा पाच वर्षाचा कार्यकाळ आज दि.17 फेब्रुवारी 2022 रोजी संपुष्टात येत आहे. तरी सुद्धा काही नगरसेवकांनी प्रभागातील नागरीकांच्या अपेक्षा पूर्ण केल्या नाहीत त्या भंगच केलेल्या आहेत. काही नगरसेवकांना तर पाच वर्षे नगरपरिषद समजून घेण्यातच गेली.
तसेच पाहिले तर नगरसेवक हाच पक्षाची ध्येयधोरणे प्रत्यक्षात घरोघरी पोचविणारा खरा दुवा असतो. नगरसेवकांना माहिती आणि संसाधनांनी युक्त बनविण्याचे प्रयत्न झाले पाहिजे होते. मात्र हे निवडून आलेनंतर त्यांनी कोणाचे ऐकून अधिकार्यांमागे कामाचा तगादा लावू नये अशीच व्यवस्था त्यांना मिळाली. त्यामुळे काही महिन्यात, वर्षातच त्यांचा भ्रमनिरास झाला.
नगरपरिषदेत कामे कशी करावीत, प्रभाग व शहराच्या विकासासाठी तो काय करू शकतो, याचे ज्ञान त्याला देणे महत्वाचे होते. नगरपरिषदेने किंवा निवडणूक आयोगाने या नगरसेवकांचे प्रशिक्षण वर्ग घेण्याची गरज होती. असे काही न करता केवळ या यंत्रणेवर टीका होत असल्याने शहराचे विद्रुपीकरण होताना दिसत आहे.
मतदारांनो नगरसेवक चांगला निवडा….
बारामती नगरपरिषदेचा पाच वर्षाचा कालावधी संपुष्टात आला आहे. काही महिन्यातच नगरपरिषदेची निवडणूक उंबरठ्यावर येवून ठेपली आहे. आता गल्ली बोळीतून आयात-निर्यात केलेले नगरसेवक तुमच्याकडे येतील, हात-पाय दाबतील, पैश्याचे अमिष दाखवतील, सुख-दु:खात येतील. जाती-पातीचे ढोंग करतील त्यामुळे नागरीकांनी येणार्या काळात चांगला नगरसेवक निवडा जो तुमच्या हाकेला धावेल व अपेक्षा पूर्ण करेल. अपेक्षा भंग करणारा नव्हे….
प्रत्येक प्रभागातून निर्भिड व निस्वार्थपणे विषय मांडणारे, तडीस नेणारे निलेश पलंगे सारखे निर्माण होणे गरजेचे होते मात्र तसे होताना दिसले नाही.