बारामती(वार्ताहर): जगभरात तंत्रज्ञानाच्या मदतीने अधिक फायदेशीर शेती होऊ लागली असून, हे तंत्रज्ञान प्रत्यक्षात पाहता येण्यासाठी व आपल्या शिवारातही हे प्रयोग कसे करता येतील याचे मार्गदर्शन ऍग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टद्वारा आयोजित कृषि तंत्रज्ञान सप्ताहाच्या निमित्ताने राज्य व देशातील शेतकर्यांना अनेक नाविन्यपूर्ण बाबी पहावयास मिळणार आहे.
ऍग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट कृषी विज्ञान केंद्रावर 9 ते 13 फेब्रुवारी 2022 या कालावधीत कृषिक कृषी तंत्रज्ञान सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. या सप्ताहाला ज्येष्ठ नेते खासदार शरदचंद्रजी पवार, उपमुख्यमंत्री ना.अजित पवार, कृषिमंत्री ना.दादा भुसे, उच्च तंत्रशिक्षण मंत्री ना.उदय सामंत, पर्यावरणमंत्री ना.आदित्य ठाकरे हे भेट देणार असल्याचे ट्रस्टचे प्रमुख राजेंद्र पवार यांनी दिली.
या सप्ताहामध्ये शेतकर्यांना होमिओपॅथीचा कृषी क्षेत्रात प्रभावी वापर करून उत्तम प्रकारची शेती करता येते याचे जिवंत प्रात्यक्षिक, एम्ब्रिओ ट्रान्सप्लांट पद्धत वापरून वासरांची निर्मिती व पशुरोग निदान सुविधा या सप्ताहात पाहता येईल भाजीपाला गुणवत्ता केंद्रात भाजीपाला लागवडीचे प्रगत तंत्रज्ञान व एक्सपोर्ट पर्यंतचे मार्गदर्शन उपलब्ध आहे.
कृषी क्षेत्रातील अद्ययावत व नावीन्यपूर्ण गोष्टी पाहता येतील. यापूर्वी न पाहिलेल्या अनेक शेती व शेतीपूरक व्यवसायाच्या प्रयोगांची पाहणी येथे करता येईल. सूक्ष्म अन्न प्रक्रिया लघुउद्योग, मशिनरी प्रक्रिया मार्गदर्शन उपलब्ध आहे. जर्मनी, चीन, नेदरलँड, थायलंड, जपान या देशांमध्ये वापरले जाणारे खत व्यवस्थापनाचे तंत्रज्ञान त्याचबरोबर अत्यंत कमी खतमात्रेमध्ये अधिकाधिक उत्पादन घेण्याचा प्रयोग पाहता येईल.
सेन्सर, ड्रोनद्वारे फवारणी तंत्रज्ञान आणि रोबोटिक्स, अत्याधुनिक मशिनरी ठिकाणी आहेत. या जपान, कोरिया, नेदरलँड, थायलंड, अमेरिका आदी देशांतील भाजीपाला, आरोग्यदायी भरडधान्य, फुलांच्या विविध जाती व लागवड तंत्रज्ञान, मधुमक्षिका पालन, जैविक खते, उत्पादन व इतर बरेच काही या ठिकाणी पाहायला मिळणार आहे.
नुकत्याच जाहीर झालेल्या केंद्रीय अर्थसंकल्पात शेतीविषयक धोरणे जाहीर केलेली आहेत. त्याचा फायदा थेट शेतकर्यांना होण्यासाठी ट्रस्टद्वारे विशेष प्रयत्नांचा कृती आराखडा सुनिश्र्चित केलेला आहे.
बदलत्या कृषी क्षेत्राला केंद्र सरकार व राज्य सरकारच्या विविध योजनांचा लाभ थेट शेतकर्यांपर्यंत पोहोचवणे व तरूण पिढीतील नवीन संकल्पनांना प्रोत्साहन देण्यासाठी तशा दर्जाच्या स्टार्टअपला प्लॅटफॉर्म देण्याचा प्रयत्न या कृषी तंत्रज्ञान सप्ताहामध्ये करत आहोत. 9 ते 13 फेब्रुवारीदरम्यान शेतकरी बांधवांनी या सप्ताहास भेट देवून लाभ घ्यावा. – राजेंद्र पवार, चेअरमन ऍग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट, बारामती