शेटफळ तलाव लाभक्षेत्राचे पाणी उचलीचे 65 परवाने 10 गावांची शेती पाण्याअभावी येणार धोक्यात – हर्षवर्धन पाटील

अशोक घोडके यांजकडून….
इंदापूर(वार्ताहर): शेटफळ तलाव लाभक्षेत्राचे पाणी उचलीचे 65 परवाने दिल्याने पाण्याचा प्रचंड उपसा होऊन या लाभक्षेत्रावर अवलंबून असणार्‍या 10 गावांची शेती पाण्याअभावी धोक्यात येणार असल्याचे मत माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी व्यक्त केले.

शेटफळ तलाव बचाव कृती समितीच्या वतीने बावडा येथे लाभ क्षेत्रातील 10 गावातील शेतकर्‍यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. सदर बैठकीमध्ये शेतकर्‍यांना मार्गदर्शन करताना हर्षवर्धन पाटील बोलत होते. या वेळी पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक आप्पासाहेब जगदाळे तसेच 10 गावातील शेतकरी उपस्थित होते.

श्री.पाटील पुढे म्हणाले की, या ब्रिटिशकालीन तलावातून सुमारे 110 वर्षांपासून बावडा परिसरातील लाभक्षेत्रातील 10 गावांमधील शेतीला पाणी मिळत आहे. सध्याच्या राज्यकर्त्यांनी व जलसंपदा विभागाने पाणी उचलण्याचे बेकायदेशीर परवाने दिले आहे. या निर्णयाविरोधात व दिलेले परवाने रद्द करण्यासाठी लवकरच जलसंपदाच्या वकीलवस्ती कार्यालयासमोर शेतकर्‍यांचे रास्ता रोको, धरणे आंदोलन होणार असल्याचे त्यांनी सांगितले.

या तलावामुळे शेटफळ, भोडणी, सुरवड, वकीलवस्ती, लाखेवाडी, बावडा, पिठेवाडी, निरनिमगाव, कचरवाडी (बा.), सराटी या 10 गावांमधील शेती बागायती झाली आहे. परिसरातील अनेक गावांचा पिण्याचा पाण्याचा प्रश्न संपुष्टात आला आहे. मात्र सध्याच्या राज्यकर्त्यांनी या तलावातून पाणी उचलण्यासाठी नियम बाजूला ठेऊन पाणी परवाने दिले आहेत. त्यामुळे तलावातील पाणीसाठा लवकर संपुष्टात येऊन लाभक्षेत्रातील 10 गावांमधील शेतीपिके पाण्याअभावी धोक्यात येणार आहेत. या मोठ्या धोक्यासंदर्भात शेतकर्‍यांमध्ये जनजागृती निर्माण झालेली आहे. जलसंपदाच्या या निर्णयाविरुद्ध कृती समितीच्या वतीने अनेक पातळ्यांवर लढा द्यावा लागणार आहे.

याबैठकीत बोलताना अप्पासाहेब जगदाळे यांनी सांगितले की, तलावातून पाणी उपसा परवाने नियमबाह्य दिल्याने लाभक्षेत्रातील 10 गावांमधील शेतीचे वाळवंट होण्यास वेळ लागणार नाही. त्यामुळे शेतकर्‍यांनी लढा दिल्यास जलसंपदाच्या या मनमानी निर्णयाविरोधात यश नक्की मिळणार आहे.

यावेळी कृती समितीच्या वतीने प्रास्ताविक प्रा.पंडितराव पाटील यांनी केले. तर सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील कारखान्याचे संचालक महादेव घाडगे यांनी आभार मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!