अशोक घोडके यांजकडून…
इंदापूर(वार्ताहर): इंदापूर शहराच्या वैभवात भर पडेल अशी दिमाखदार न्यायालयाची वास्तु झाली असून, या वास्तुतून नागरीकांना उत्कृष्ट सेवा मिळेल अशी आशा राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी व्यक्त केली.
या नूतन इमारतीच्या उद्घाटनाच्या पूर्वसंधेला राज्याचे सार्वजिक बांधकाम राज्यमंत्री दत्तात्रय भरणे इमारतीची संपूर्ण पाहणी करत माध्यमांशी बोलताना सांगितले.
इंदापूर येथील दिवाणी न्यायाधीश (कनिष्ठ स्तर) व न्यायदंडाधिकारी प्रथम श्रेणी न्यायालयाच्या नवीन इमारतीचा उद्घाटन समारंभ विविध मान्यवरांच्या उपस्थित रविवार दि.6 फेब्रुवारी रोजी दुपारी 12 वाजता होणार होता. मात्र, भारतरत्न गानगोकीळा लता मंगेशकर यांच्या निधनामुळे केंद्र सरकारने दोन दिवसाचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर केल्याने सदर कार्यक्रम रद्द करण्यात आला असल्याचे समजते.
आ.भरणे बोलताना म्हणाले की, इंदापूर शहरात पूर्वीची जुनी इमारत पाडून त्याजागी नवीन इमारत व्हावी अशी इंदापूरचे वकील मंडळी, पक्षकार व इंदापूरकरांची गेल्या अनेक दिवसाची मागणी होती. सन 2014 मी आमदार झाल्यावर इंदापूर बार असोसिएशनने सन्मान ठेवला होता. या प्रसंगी न्यायालय इमारतीची खंत व्यक्त करण्यात आली होती. या इमारतीसाठी निधी कसा प्राप्त होईल यासाठी वेळोवेळी पाठपुरावा केला. आज ही इमारत दिमाखात उभी आहे असेही ते म्हणाले.
आ.भरणे पुढे बोलताना म्हणाले की, माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून सर्वात प्रथम निधी मंजूर करून प्रशासकीय मान्यता घेतली. इमारतीचे काम सुरु झाले, कोरोनामुळे खूप मोठी अडचणींना तोंड द्यावे लागले. निधी कमी पडू नये यासाठी राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील तात्काळ निधी उपलब्ध करुन दिला. वरील सर्वांचेच त्यांनी आभार व्यक्त केले. या वास्तूत आल्यानंतर चांगला सकारात्मक विचार रुजले जातील असेही ते म्हणाले.
यावेळी इंदापूर तालुका बार असोसिएशनचे सर्व पदाधिकारी, वकील, शासकीय अधिकारी व राष्ट्रवादी कॉंग्रेस चे सर्व आजी माजी पदाधिकारी उपस्थित होते.