अशोक घोडके यांजकडून…
इंदापूर(वार्ताहर): गेली 27 वर्ष अनियमित कामगारांनी नियमित करून घेण्यासाठी इंदापूर नगरपरिषदेसमोर सुरू दि.25 जानेवारीपासुन सुरू असलेले साखळी उपोषण येत्या आठ दिवसांत संबंधित विभागाच्या मुख्य सचिवांसोबत बैठक लावून मार्ग काढला जाईल असे आश्वासन मंत्री भरणे यांनी आंदोलकांना दिल्यानंतर हे आंदोलन तात्पुरते स्थगित करण्यात आले.
गेल्या दहा दिवसापासून हे आंदोलन सुरु होते.आंदोलनाच्या दहाव्या दिवशी माजी नगरसेवक श्रीधर बाब्रस यांनी मुख्याधिकारी रामराजे कापरे,माजी नगरसेवक राजेंद्र चौगुले व राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष बाळासाहेब व्यवहारे यांच्या समक्ष सामान्य प्रशासन राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्याशी आंदोलक कर्मचार्यांचे बोलणे करुन दिले. आंदोलक कर्मचार्यांनी साखळी उपोषण स्थगित करीत असल्याचे लेखी स्वरूपात दिले असून मुख्याधिकारी कापरे यांचे समक्ष राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्याशी गुरूवारी दि.03 फेब्रुवारी रोजी भ्रमणध्वनी वरुन संपर्क झाला.
नगरपरिषदेचे सर्व नगरसेवक व इंदापूर शहरातील विविध पक्षाचे पदाधिकारी यांच्या विनंतीस मान देऊन आम्ही हे साखळी उपोषण तात्पुरते स्थगित करीत असल्याचे म्हटले आहे.
दरम्यान प्रजासत्ताक दिनी माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांनी ही या आंदोलकांची भेट घेऊन आपण कर्मचार्यांच्या पाठीशी असल्याचे सांगितले होते. तर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे पुणे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर यांनी देखील कर्मचार्यांचा प्रश्न सोडवण्यासाठी आपण प्रयत्नशील असल्याचे सांगत कर्मचार्यांनी आंदोलन मागे घ्यावे असे आवाहन केले होते.
इंदापूर नगरपरिषद अनियमीत कर्मचारी गेली 27 वर्ष नगरपरिषदमध्ये सेवा करीत आहेत. कोरोना काळामध्ये ही सदरच्या कर्माचार्यांनी अहोरात्र काम केले आहे. याच कर्मचार्यांमुळे भारत सरकारकडून मिळणारा स्वच्छ सर्व्हेक्षण पुरस्कार सलग 4 वर्ष मिळविला आहे. या कर्मचार्यांना सन 2005 पासून अनियमीत ठरविणेत आलेले आहे. 5 व्या वेतन आयोगा प्रमाणे पगार मिळाल्याचे आर्थिकबाबींना सामोरे जावे लागत आहे. नियमित होणार या आशेवर बसलेल्या कर्मचार्यांपैकी 10 कर्मचारी मृत्यू पावले आहेत. तरी सुद्धा महाराष्ट्र शासनाने कोणतीही दखल घेतली नाही. 11 वा कर्मचारी मृत्यू होण्यापूर्वी कर्मचारी नियमित व्हावे असे भारतीय मजदूर संघटनेचे राज्य कार्यकारणी सदस्य मोहन शिंदे यांनी बोलताना सांगितले आहे.