बारामती(वार्ताहर): पिडीत मुलीचा पाठलाग करीत, तुझ्या भावाला जीवे मारून मी आत्महत्या करेन अशी भिती दाखवून मुलीबरोबर तिच्या मर्जीविरूद्ध विवाह केल्याबद्दल ऋषिकेश अविनाश जगताप (रा.कोळीमळा, बारामती) याच्या सह शुभम कराळे व किरण खोमणे यांच्यावर बारामती शहर पोलीस स्टेशन येथे गु.र.नं.37/22 कलम 366,354,34 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, दि.30जानेवारी 2022 रोजी दाखल झालेल्या तक्रारी नुसार पीडित मुलगी पुण्याला एसटी मधून जात असताना ती पुण्यामध्ये पोहोचली नसल्याने शहर पोलिसांनी मिसिंग दाखल करून घेतली. या दाखल केलेल्या केसचा तपास करून मुलीला पोलीस ठाण्यात आणले असता. पिडीत मुलीने दिलेल्या तक्रारीत म्हटले की, गेल्या सहा महिन्यापासून ऋषिकेशची ओळख होती. ओळखीनंतर त्याने सतत पाठलाग करायला सुरूवात केली. त्यास पिडीत मुलगी विरोध करत होती तरीही ऋषिकेश लग्नाची मागणी घालत होता. मात्र, पिडीत मुलीची ऋषिकेशबरोबर लग्न करण्याची मानसिकता नव्हती.
मुलीच्या नातेवाईकांनी तिला पुण्याला जाण्यासाठी बारामती बस स्थानकावर सोडले ही माहिती ऋषिकेशला समजली. त्याने सदर मुलगी ज्या एसटीमधे होती तिचा पाठलाग केला कसबा या ठिकाणी बस थांबवली व तिला खाली उतरण्यास सांगितले परंतु सदर मुलीने त्याचे ऐकले नाही नंतर सदर मुलाने त्या मुलीस मोबाईलवर फोन करून सांगितले की, ती जर एसटीमधून उतरली नाही आणि त्याच्यासोबत आली नाही तर तिच्या भावाला मारून टाकू व स्वतःही आत्महत्या करेल. यामुळे सदर मुलगी भयभीत होऊन शिवरी या ठिकाणी एसटी म्हणून खाली उतरली. यावेळेस आरोपी ऋषिकेश अविनाश जगताप याने तिला सोबत घेऊन आळंदी या ठिकाणी तिच्या मर्जीविरुद्ध तिच्या सोबत विवाह केला. सदर विवाहाला शुभम कराळे व किरण खोमणे (दोघे रा.बारामती) हे साक्षीदार म्हणून उपस्थित होते. या तक्रारीवरून या तिघांविरोधात विनयभंग केला, मर्जीविरूद्ध विवाह आळंदी याठिकाणी केला म्हणून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक सुनिल महाडिक यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय युवराज घोडके हे करीत आहेत.