मुंबई : पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे माजी मानद सचिव नारायणराव तापकीर यांचे निधन झाल्याची बातमी ऐकून धक्का बसला. त्यांच्या निधनाने पुण्याच्या शैक्षणिक चळवळीचं मोठं नुकसान झालं असून सामाजिक, शैक्षणिक चळवळीत तळमळीने कार्य करणारा सच्चा सहकारी मी गमावला आहे, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दु:ख व्यक्त करून त्यांना श्रद्धांजली वाहिली.
उपमुख्यमंत्री अजित पवार आपल्या शोकसंदेशात म्हणतात, नारायणराव तापकीर यांनी पुण्याच्या सामाजिक, शैक्षणिक चळवळीत दीर्घकाळ मोलाचं योगदान दिलं. पुणे शिक्षण मंडळाचे मानद सचिव म्हणून त्यांचे कार्य सदैव स्मरणात राहील. त्यांचे बंधू माजी आमदार अशोक तापकीर यांचे काही महिन्यांपूर्वी झालेल्या निधनानंतर आज नारायणराव तापकीर यांच्या निधनाने तापकीर कुटुंबावर झालेला आघात मोठा आहे.
या दु:खातून सावरण्याची शक्ती तापकीर कुटुंबियांना मिळो, आम्ही सर्वजण त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात सहभागी आहोत, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्या शोकभावना व्यक्त केल्या आहेत.