मुंबई : नागरी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या क्षेत्रात राहणाऱ्या केवळ संरक्षण दलातील शौर्य पदक धारकांना व माजी सैनिकांच्या विधवा पत्नीच्या नावावर असलेल्या मालमत्तांना तसेच दि.०९.०१.२०१७ च्या शासन निर्णयानुसार संरक्षण दलातील अविवाहित शहिद झालेल्या सैनिकांच्या नामनिर्देशित मालमत्तांना मालमत्ता करातून सूट देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
“मा.बाळासाहेब ठाकरे माजी सैनिक व त्यांच्या विधवा पत्नीला मालमत्ता कर माफी योजना”, ही योजना नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये राबविण्याचे प्रस्तावित असून या योजनेंतर्गत राज्यातील नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांमधील सर्व माजी सैनिकांच्या मालमत्तांना मालमत्ता करात सूट देण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. त्यानुसार आता शासनाने निर्णय घेतला आहे.
माजी सैनिकांनी देशासाठी प्राणाची बाजी लावून जीवाची पर्वा न करता निस्वार्थीपणे देशाचे संरक्षण केले आहे. त्यांनी केलेले देशाची सेवा व विविध स्तरावरुन प्राप्त झालेली मागणी विचारात घेता सर्व माजी सैनिकांचे मनोबल उंचावून त्यांना उचित सन्मान देण्याच्या दृष्टीकोनातून नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या कार्यक्षेत्रात वास्तव्य करणाऱ्या सर्व माजी सैनिकांना मालमत्ता करातून सूट देणे आवश्यक आहे.
राज्यातील नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांमधील मालमत्ता कराबाबत महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम १९४९, मुंबई महापालिका अधिनियम १९८८ व महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नागरी अधिनियम १९६५ मध्ये तरतुदी करण्यात आलेल्या आहेत. प्रस्तावनेत नमूद केलेली वस्तुस्थिती लक्षात घेऊन “मा.बाळासाहेब ठाकरे माजी सैनिक व त्यांच्या विधवा पत्नीला मालमत्ता कर माफी योजना”, या योजनेंतर्गत नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या कार्यक्षेत्रात वास्तव्य करणाऱ्या सर्व माजी सैनिकांना मालमत्ता करातून सूट देण्याचा शासनाने निर्णय घेतला आहे. अशा कर माफीस पात्र ठरणाऱ्या व्यक्तीने जिल्हा सैनिक कल्याण अधिकाऱ्याचे प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक राहिल.