बारामती(वार्ताहर): येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि जनरल हॉस्पीटलमधील 186 प्राध्यापक व निवासी डॉक्टर यांची नियुक्ती असताना प्रत्यक्षात बोटावर मोजता येतील एवढेच रूग्णांना सेवा देत कर्तव्य बजावित आहेत. या डॉक्टरांच्या निष्काळजी पणामुळे कित्येक रूग्णांना प्राण गमवावे लागले त्यामुळे या डॉक्टरांचे मासिक वेतन थांबवून यांच्यावर सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी लेखी अर्जाद्वारे वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता यांना करण्यात आली आहे.
सा.वतन की लकीरच्या टीमने प्रत्येक शासकीय दवाखान्याचा व तेथील वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी यांची समक्ष पाहणी केली असता हे सत्य समोर आले आहे. प्रत्येकी डॉक्टरांना अंदाजे 1 लाख ते सव्वा लाख पगार शासनाकडून मिळत आहे.
ज्युबिली शासकीय रूग्णालय, रूई ग्रामीण रूग्णालय याठिकाणी जावून पाहणी व चौकशी केली असता, बोटावर मोजता येतील एवढेच वैद्यकीय अधिकारी (डॉक्टर) नियुक्तीच्या वेळेत व वेळ पडल्यास 12 तास सेवा देताना दिसले. वरील विभागातील डॉक्टरांना ड्युटी लावली मात्र, त्याठिकाणी ते डॉक्टर हजर नव्हते. महिन्यातून एक दिवस येऊन सेवा देताना दिसले आणि सहा आकडी पगार घेत असल्याचे दिसून आले.
वरील 168 नियुक्त डॉक्टरांपैकी काही डॉक्टरांनी चोख, तत्पर सेवा बजावली. मात्र काहींनी उपस्थिती न दर्शविता लाखो रूपयांचा पगार लाटला. या प्रकारामुळे बारामती तालुका व शहरात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढला. कित्येक रूग्णांना आपले प्राण गमवावे लागले, त्यामुळे अशा सेवा न बजाविता लाखो रूपयांचा पगार लाटणार्या वरील विभागातील डॉक्टरांवर सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा. या डॉक्टरांना जनतेच्या पैशातून होणारा पगार थांबवावा अशीही मागणी करण्यात आली आहे.
वैद्यकीय महाविद्यालया असणारे विभाग….
शरीरशास्त्र, शरीरविज्ञान, बायोकेमिस्ट्री, औषधनिर्माणशास्त्र, पॅथॉलॉजी, सूक्ष्मजीवशास्त्र, न्यायवैद्यक औषध (फॉरन्सीक), सामुदायिक औषध (कम्युनिटी), सामान्य औषध, बालरोगशास्त्र, क्षय आणि श्वसन रोग (फुफ्फुसीय औषध), त्वचाविज्ञान, स्त्री रोगशास्त्र आणि कुष्ठरोग (त्वचा आणि व्हीडी), मानसोपचार, जनरल सर्जरी, अस्थीरोग (ऑर्थोपेडिक्स), ईएनटी, नेत्रविज्ञान, प्रसुतीशास्त्र आणि स्त्रीरोगशास्त्र, भूल, रेडिओडिओग्नोसिस, दंतचिकित्सा या 21 विभागामध्ये एकुण 168 तज्ञ डॉक्टर नियुक्त करण्यात आलेले आहेत.