बारामती(वार्ताहर): संभाजी बिडीचे उत्पादन करणार्या संजय साबळे/वाघीरे मालकावर सासवड पोलीस स्टेशन याठिकाणी भारतीय दंड संहिता 1860 चे 295-अ कलमानुसार दि.8 सप्टेंबर रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शिवधर्म फाऊंडेशनचे अध्यक्ष दीपक काटे, मच्छिंद्र टिंगरे यांच्यासह रवी पडवळ, दिनेश ढगे, सागर पोमण, सुनील पालवे यांनी छत्रपती संभाजी महाराजांचे नाव वापरून बिडीचे उत्पादन करत आहे. राष्ट्रपुरूषांचे नाव वापरून तंबाखूजन्य पदार्थांचे उत्पादन बंद करावे या मागणीसाठी शिवधर्म फाऊंडेशनच्या कार्यकर्त्यांनी पुरंदर किल्ल्याच्या पायथ्याशी आमरण उपोषण सुरू केले होते. सासवडच्या पोलीसांनी कोरोनाच्या पार्श्र्वभूमीवर महामारीचे व आंदोलनाचे ठिकाणी गर्दी होवून संसर्ग पसरण्याची शक्यता असल्याचे कारणामुळे सदरचे उपोषणापासून परावृत्त केले आणि संबंधित मालकावर महापुरूषाची बदनामी केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला.
शिवधर्म फाऊंडेशनच्या कार्यकर्त्यांनी दि. 19 ऑगस्ट 2020 रोजी साबळे/ वाघीरे या व्यावसायीक समूहाच्या साबळे हाउस 408/4-5, गुलटेकाडी पुणे सातारा रोड पुणे येथील कार्यालयात जावून समूहाचे चेअरमन तथा मनेजींग डायरेक्टर संजय साबळे यांची भेट घेतली होती. छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराज यांचा एकेरी उल्लेख करून धार्मिक भावनांवर अत्याचार करण्याचे कृत्य बुध्दीपुरस्पर व दृष्ट उद्देशाने केले असल्याचे निवेदन सादर केले. उलट दि.21 ऑगस्ट 2020 रोजी आपल्या मालाला संभाजी हे नांव फक्त मराठी माणूसच देऊ शकतो, हिंदू माणसाशिवाय असे कोणीही करणार नाही असे प्रतिउत्तर देवून संभाजी महाराज यांचे नाव दिल्याची कबुली दिली. यापुर्वी सन 2011 मध्ये या विरोधात केलेल्या आंदोलन कर्त्यांना लेखी उत्तरात आमच्या वाडवडिलांनी त्यांच्या बिडीला संभाजी असे नाव दिले आहे, असे कबुल केले आहे.
छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराज यांचे नावाचा एकेरी उल्लेख करून श्रध्देय महापुरुषांचा अवमान करून धार्मीक भावना दुखावल्या गेल्या आहेत. या बिडीचे आवरण वापरानंतर शौचालय, मुताची, गटार अशा अपवित्र ठिकाणी फेकले जात आहे. वरील सर्व बाबींमुळे छत्रपती संभाजी महाराजांचा अवमान होवून आमच्या धार्मिक भावना दुखावल्या जात आहेत.