बारामती(वार्ताहर): शहराच्या विविध भागात भीक मागणारे लोक सातत्याने बघायला मिळतात. अनेकदा लहान मुले खांद्यावर तान्ही बाळ घेऊन भीक मागतात तर कधी महिला ऐन उन्हात मुलांना रस्त्यावर आणून लोकांकडे पैसे मागत असतात. भारतीय संस्कृतीनुसार दान-धर्म करावे असे म्हटले आहे. या भिकार्यांना पैसे न देता अन्न, पाणी द्या असे ऑल इंडिया पोलीस जनसेवा संघटनेचे कार्याध्यक्ष अमिन शेख यांनी आवाहन केले आहे.
आपण सर्व मिळून एक चळवळ उभी करू या, सहज एक रूपया काढून त्या भिकार्याला आपण देत असतो. त्यास पैश्या स्वरूपात मदत न करता अन्न, पाणी किंवा वस्तुस्वरूपात मदत करा.
ही चळवळ जर समाजात रूजली तर आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय व राज्यस्तरावर ’भिकारी’ या गटातील टोळ्या तुटतील आणि मग लहान मुलाचे अपहरण स्वत:हून बंद होईल. गुन्हेगारांच्या जगातील अशा टोळ्यांचा अंत होण्यास मदत होईल.
तुम्हाला एखाद्या महिला, पुरूष, वृद्ध किंवा अपंग मुलांबाबत खूप काही वाटलं तर स्वत:बरोबर किंवा वाहनात बिस्कीटचे पुडे ठेवा पण पैसे देऊ नका. कित्येक भिकारी व्यसनाच्या आहारी गेलेली दिसत आहेत.
शासनाने विधी व न्याय विभागाने सन 1960 चा मुंबई अधिनियम, क्रमांक 10 मुंबईचा भीक मागण्यास प्रतिबंध करण्याबाबत अधिनियम, 1959 लागू केलेला असताना सुद्धा यांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढच होत चाललेली आहे. तरी आपण जागृत होऊन पैसे न देता अन्न,पाणी किंवा जीवन उपयोगी वस्तु देवून यांची मदत करा ही चळवळ रूजविण्यासाठी प्रयत्न करा असेही आवाहन शेख यांनी केले आहे.
भिक मागण्यास लावणार्यावर किंवा सर्वस्वी भिकार्यावर अवलंबून असणार्या व्यक्तींना अटकावून ठेवण्याचा आदेश न्यायालय देवू शकतात. अशा व्यक्तींना शास्ती सुद्धा होवू शकते. अशी व्यक्ती सतत उल्लंघन करीत असेल तर शिस्तभंगाबद्दल कैदेची शिक्षा होऊ शकते.