बारामती(वार्ताहर): भारताची लोकशाही ही जगातील सर्वोत्तम लोकशाही असल्याचे प्रतिपादन बारामती नगरपरिषदेचे आरोग्य निरीक्षक कोव्हीड योद्धे राजेंद्र सोनवणे यांनी केले.
स्वतंत्र भारताचा 73 वा प्रजासत्ताक दिन कै.ग.भि.देशपांडे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात कोविडचे सर्व नियम पाळत उत्साहात साजरा करण्यात आला. राजेंद्र सोनवणे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे मुख्याध्यापक उमेद सय्यद होते.

या कार्यक्रमाला शाळा समन्वयक पुरूषोत्तम कुलकर्णी, प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका सौ.सुनिता चव्हाण, पूर्व प्राथमिक मुख्याध्यापिका सौ.अनिता तावरे, उपमुख्याध्यापक धनंजय मेळकुंदे , पर्यवेक्षक राजाराम गावडे, शेखर जाधव, चंदू गवळे तसेच शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, पालक उपस्थित होते.
पुढे बोलताना सोनवणे म्हणाले की, भारताची लोकशाही ही स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि मानवता या मूल्यावर आधारित असून, ती जगातील सर्वोत्तम लोकशाही आहे. प्रजासत्ताक असलेल्या आपल्या देशात सर्व नागरिकांना समान हक्क याच दिवशी बहाल करण्यात आले. आपला देश संविधानानूसार चालतो असेही ते म्हणाले.
गेल्या दोन वर्षाच्या कोरोना काळात मृत रुग्णांचे अंत्यसंस्कार करण्याचे उल्लेखनीय काम करणार्या एका कोविड योद्ध्याला आजचा ध्वजारोहणाचा मान देण्यात आला. असा मान देणारी म.ए.सो ही महाराष्ट्रातील एकमेव संस्था आहे . शाळेच्या उज्वल निकालाच्या परंपरेचा आलेख सतत उंचावत ठेवण्याचा आपण सगळेजण मिळून प्रयत्न करूया असे विचार यावेळी विद्यालयाचे मुख्याध्यापक यांनी व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यालयाचे क्रीडाशिक्षक दादासाहेब वनवे यांनी केले.