अशोक घोडके यांजकडून…
इंदापूर(वार्ताहर): बारामतीचे प्रगतशिल बागायतदार व आडत व्यावसायिक तुकाराम दादासाहेब झांबरे यांचे वृद्धापकाळाने रविवार दि.23 जानेवारी 2022 रोजी वयाच्या 87 व्या वर्षी राहते घरी दु:खद निधन झाले.
तुकाराम झांबरे यांना बापू म्हणून सर्वत्र ओळख होती. त्यांचा स्वभाव मनमिळावू, व्यक्तीमत्व करारी व संयमी होता. शेतकर्यांनी उत्पादीत केलेल्या मालाला योग्य भाव मिळण्यासाठी त्यांची सतत तळमळ असे. शेतकर्यांची गरज पाहुन त्यांनी मदत केली. यामुळे बापूंवर तालुक्यातून येणार्या शेतकर्यांचा विश्र्वास वाढला, बापूंनी सुद्धा त्यांच्या जीवनात या विश्र्वासाला कधीही तडा जावू दिला नाही.
बारामती येथे शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांचे ते सासरे होत. त्यांचे पाठीमागे पत्नी, दोन मुले, एक मुलगी, सुना, नातवंडे असा मोठा परिवार आहे. इंदापूर तालुका जिजाऊ महिला बचत गट फेडरेशनच्या अध्यक्षा भाग्यश्री पाटील तसेच उद्योजक सुनील झांबरे व अनिल झांबरे यांचे ते वडील होत. बारामती येथे अंत्यसंस्कार प्रसंगी विविध क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थित राहून श्रद्धांजली अर्पण केली.