बारामती(वार्ताहर): महापुरूषांचे विचार सातासमुद्रापार नेले, दिन-दलित, कामगार, कष्टकर्यांचे प्रश्र्न मांडणारे आण्णाभाऊ साठे हे प्रसिद्ध आणि प्रतिष्ठीत नसल्याचे म्हणून महापुरुषांच्या यादीतून जाणीवपूर्वक नाव वगळल्याने केंद्र शासनाचा बारामतीत समाज बांधवांतर्फे जाहिर निषेध करण्यात आला.
बारामती शहरातील हुतात्मा चौकात विविध पक्ष संघटनांचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी एकत्रित येत केंद्राचा निषेध निदर्शने केंद्र सरकारविरोधी घोषणा करत व भिगवन चौक या ठिकाणी ठिय्या आंदोलन करीत निषेध नोंदवला.
केंद्राच्या अखत्यारीतील डॉ.बाबासाहेब आंबेडकर फाउंडेशनद्वारे देशभरातील थोर समाज सुधारक व महामानवांची यादी तयार केली जाते. या यादीतील अण्णाभाऊंचे समाविष्ट असलेले नाव वगळण्यात आले. या अनपेक्षित कृत्यामुळे मातंग समाज व अण्णाभाऊ अनुयायांच्या भावना दुखावल्या गेल्याने सदर घटने बद्दल निषेध आंदोलन करण्यात आले.
अण्णाभाऊ साठे जागतिक स्तरावरील थोर साहित्यिक म्हणून ओळखले जातात. त्यांनी लिहिलेल्या अनेक कथा, कादंबर्या भारत देशासह परदेशातील विविध भाषेत भाषांतरित झाले असून त्या लोकप्रिय ठरल्या आहेत. दीन -दलित, वंचित, उपेक्षित समाजाच्या व्यथा अण्णा भाऊंनी आपल्या कथा-कादंबर्यातून मांडल्या व समाजातील वंचित घटकांना प्रकाशात आणून वास्तव समाजासमोर मांडले. छत्रपती शिवाजी महाराजांचा पराक्रमी इतिहास सातासमुद्रापलीकडे पोवाड्याच्या माध्यमातून पोहोचवला. अण्णाभाऊंचे विचार रशियासारख्या बलाढ्य देशाने स्वीकारले असल्याचे बिरजू मांढरे, सुनील शिंदे, राजू मांढरे, विजय खरात, अमृत नेटके, साधू बल्लाळ, चंद्रकांत खंडाळे, सोमनाथ पाटोळे, विजय नेटके, निलेश जाधव, विशाल जाधव यांनी आपल्या मनोगतातून सांगून सदर घटनेचा निषेध व्यक्त केला.
या निषेध आंदोलनात बारामती शहर व तालुक्यातील मातंग समाज बांधव बहुसंख्येने उपस्थित होता.