बारामती(वार्ताहर): राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे निष्ठावंत कार्यकर्ते व सामाजिक न्याय विभागाचे पुणे जिल्हा उपाध्यक्ष साधु रावसाहेब बल्लाळ यांच्या कार्याची दखल घेत जिल्हा दक्षता व नियंत्रण समितीच्या सदस्यपदी राज्याचे उपमुख्यमंत्री ना.अजित पवार यांच्या शिफारशी नुसार नियुक्ती केली.
समाजकल्याण, सांस्कृतिक कार्य व क्रीडा विभाग मंत्रालय मुंबई यांनी काढलेल्या शासन निर्णयानुसार जिल्हा दक्षता व नियंत्रण समितीची रचना नुकतीच जाहीर करण्यात आली. यामध्ये बल्लाळ यांची नियुक्ती करण्यात आली. या समितीचे अध्यक्ष पुणे जिल्हाधिकारी असुन त्याचे सदस्य इतर तालुक्यातील आमदार व खासदार आहेत.
नियुक्ती प्रसंगी बल्लाळ म्हणाले की, या समितीच्या माध्यमातून सर्वसामान्य व तळागाळातील नागरीकांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार आहे. प्रत्येक गाव व तालुक्यातील पोलीस स्टेशनच्या हद्दीत अन्याय, अत्याचार, वाद-विवाद, जातीय दंगली व चुकीच्या पद्धतीने गुन्हे दाखल होऊ नये म्हणून सदरील समिती यावर नियंत्रण ठेवून काम करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
त्यांच्या नियुक्तीमुळे पक्षातील सर्वसामान्य कार्यकर्त्यांनी आनंद व्यक्त केला. सर्वस्तरातून साधु बल्लाळ यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.