बारामती(वार्ताहर): गुजरातच्या धर्तीवर बारामती बँकेची परराज्यात शाखा उघडण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे बारामती बँकेचे नवनिर्वाचित चेअरमन सचिन सातव यांनी बोलताना व्यक्त केले.
बारामती नगरपरिषदेचे बांधकाम सभापती सत्यव्रत काळे यांनी आई प्रतिष्ठानतर्फे आयोजित सत्कार समारंभाप्रसंगी श्री.सातव बोलत होते.
प्रथमत: बारामती सहकारी बँकेवर चेअरमनपदी निवड झालेबद्दल सचिन सातव तर मुस्लिम को-ऑप बँकेच्या संचालकपदी भरघोस मताने निवड झालेबद्दल आलताफ सय्यद यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी नगरसेवक नवनाथ बल्लाळ, मुस्लिम बँकेचे संचालक आलताफ सय्यद, पं.स.गटनेते दीपक मलगुंडे, बा.न.प.चे उपगटनेत्या सौ.सविता जाधव, नगरसेविका सौ.सुहासिनी सातव, नगरसेवक संतोष जगताप, राष्ट्रवादी कॉंग्रेस बारामती शहरचे उपाध्यक्ष सिद्धनाथ भोकरे, मा.नगरसेवक निलेश इंगुले, आबा मोकाशी, राकेश वाल्मिकी, सागर देशखैरे, निलेश पलंगे, अनिल कदम, दिपराज कदम, निलेश धालपे, शुभम अहिवळे, पांडुरंग चौधर, मनोज शेठ पटेल इ. मान्यवर उपस्थित होते.
पुढे बोलताना सातव म्हणाले की, नगरपालिका व बँकेच्या कामात खूप तफावत आहे. नगरपरिषदेत जनतेचा तर बँकेत ठेवीदारांचा पैसा असतो. जनतेचा पैसा विकासासाठी खर्च केला जातो तर बँकेचा पैसा कर्जस्वरूपात कर्जदारांना उपलब्ध करून दिला जातो. या दोघांनाही बांधील असतो. बँकेचे 6 जिल्ह्यात काम सुरू आहे. 36 शाखा, 2 हजार 230 कोटींच्या ठेवी, 1 हजार 500 कोटींचे कर्जवाटप, 4 हजार कोटींची वार्षिक उलाढाल तर 400 कामगार काम करीत आहेत.
पवार कुटुंबियांवर प्रेम करणारे आपण सर्व आहोत. राज्याचे उपमुख्यमंत्र्यांना महाराष्ट्रात नंबर एकचे मताधिक्य दिले. सत्ता असो किंवा नसो सातव कुटुंबियांनी बारामतीकरांसाठी गेल्या पन्नास वर्षांपेक्षा जास्त सेवा केली त्याचा अभिमान वाटतो. कारभारीआण्णांनी पवार साहेबांच्या राजकारणाच्या सुरूवातीला खांद्याला खांदा लावून काम केले. त्यांना निवडून आणले. तपश्र्चर्या, संस्कार व आई-वडिलांची पुण्याईमुळे काम करीत आहे. टिका-टिपण्णीकडे लक्ष न देता काम करीत राहिलो. दमडीचाही मिंदा नाही असे छाती ठोकपणे त्यांनी यावेळी सांगितले.
प्रत्येक वेळी बारामती करांसाठी रात्रं-दिवस काम केले. जास्तीच्या सुविधा कशा मिळतील ते पाहिले. सध्या निरा-डावा कालव्याचे सुशोभिकरण सुरू आहे. नदीचे काम, ऐतिहासिक बाबुजी नाईक वाडा, कन्हेरीत छ.शिवाजी महाराजांच्या जीवनावर शिवसृष्टी करीत आहोत. जिल्हा नियोजन, नगरपरिषद, बँक यावर काम कसे करणार यावर बोलताना ते म्हणाले की, सचिन सातव यांचा व्हर्जन एक होता आता व्हर्जन दोन कामातून दिसेल असे त्यांनी यावेळी सांगितले.
बँकेच्या कामाबरोबर नगरपरिषदेत सुद्धा त्यांनी उत्कृष्ठ काम केले या कामाची दखल घेत त्यांना अजितदादांनी चेअरमन पदावर काम करण्याची संधी उपलब्ध करून दिली असल्याचे दीपक मलगुंडे यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले.
गेल्या पाच वर्षात सचिन सातव यांनी उल्लेखनिय कामगिरी केली. विकास कामात जातीने लक्ष घालून काम केले. नगरपरिषदेप्रमाणे बँकेत सुद्धा ते उल्लेखनिय काम करतील अशी आशा शुभम अहिवळे यांनी व्यक्त केली.
नवनाथ बल्लाळ मनोगत व्यक्त करताना म्हणाले की, अजितदादांनी सचिन सातव यांना दिलेली जबाबदारी मार्गी लागेपर्यंत ते स्वस्थ बसत नाही. कामावर प्रेम करणारे असल्याने त्याची पावती म्हणून त्यांना चेअरमनपद दिले आहे. विकास कामे कमीत कमी खर्चात व दर्जेदार कशी करायची हे त्यांच्याकडून शिकावे तेवढे कमी आहे. नगरपरिषदेत इतरही लोकं आहेत ते इस्टीमेंट वाढविणे, चुकीची कामे करतात. सचिन सातव यांनी कधीच चुकीची कामे केलेली नाहीत. भोकरे कट्ट्यावर बँकेवर संचालक व चेअरमनपद मिळणार असल्याची झालेली चर्चा प्रत्यक्षात समोर आली. बारामतीत सातव कुटुंब राजकीय, सामाजिक क्षेत्रात आहेत म्हणून सचिन सातव यांना पद मिळालेले नसून त्यांनी केलेल्या प्रामाणिक कामातून संधी मिळाली असल्याचेही यावेळी बल्लाळ यांनी सांगितले.
सिद्धनाथ भोकरे मनोगत व्यक्त करताना म्हणाले की, तीन पिढ्यांचे सामाजिक कार्य सातव कुटुंबियांचे आहे. कारभारी आण्णांनी 25 ते 30 वर्ष नगराध्यक्ष पद भूषविले. त्याच प्रमाणे सदाशिवबापू, जयश्रीभाभी यांनी त्याप्रमाणे काम केले. सातव कुटुंब उद्योग, आर्थिक व राजकीय क्षेत्रात सुद्धा उल्लेखनीय काम करीत आहे. आण्णांचा वारसा पुढे चालविता. बारामती नगरपरिषद 39-0 करण्याचा त्यांचा प्रयत्न होता. कोणाच्या मागे रहावे हे महत्वाचे आहे. सचिन सातव कामाला महत्व देणारे आहेत. तीन पिढ्यांचे संबंध काळे-सातव व पवार कुटुंबियांचे आहेत. त्यांच्या विचारसरणीच्या पाठीशी आम्ही आहोत, अशी आणखी कोणाची विचारसरणी असेल तर त्याच्या पाठीशी सुद्धा आम्ही राहु असे त्यांनी यावेळी सांगितले.
बँकांबरोबर फायनान्स कंपन्यांचा सुद्धा सुळसूळाट सुरू आहे. ते बँकेचे सभासद, कर्जदार पळविण्याचे काम करीत असतात. बँक व फायनान्स्मध्ये फरक आहे. बारामती नगरपरिषदेत सुद्धा अशा कंपन्या आहेत. यावर सचिन सातव यांनी लक्ष द्यावे. अजितदादांचा तुमच्यावर विश्र्वास आहे. प्रत्यक्षात काम करणारे वेगळे व दादा आल्यानंतर त्यांच्या पुढे-पुढे करणारे वेगळे दिसतात असं भासवितात की, आम्हीच सर्व काम करतो. – सिद्धनाथ भोकरे
भोकरे कट्ट्याचा कौल ठरला यशस्वी….
बारामती बँकेवर सचिन सातव यांना संचालकपदाची उमेदवारी सुद्धा देणार नाही याबाबत सर्वत्र तर्क-वितर्क चर्चा सुरू होती. मात्र, भोकरे कट्ट्यावर सचिन सातव यांना संचालकपद देवून चेअरमन सुद्धा करणार असल्याचा कौल याठिकाणी बसणार्यांनी दिला तो कौल यशस्वी ठरल्याने या कट्ट्याची विश्र्वासर्हता वाढल्याचे दिसत आहे.