आहोऽऽ.. नामांकित बँक सावकार, ठेकेदार, कॉन्ट्रॅक्टर व दलालांच्या हाती

आहोऽऽ… एका नामांकित बँकेवर संचालक म्हणून सावकार, ठेकेदार, कॉन्ट्रॅक्टर व दलालांना घेतले म्हणे.. काय होईल या बँकेचे कळेना बुवा.. नाकर्तेच्या हाती काठी देवून कारभार हाकण्यास सांगितले आहे. खरं तर याला यापुर्वी एका संस्थेचा कारभार नीटनेटका पाहिल म्हणून नेत्यांनी संधी दिली. मात्र, याने नाकर्तेपणा दाखवीत विकास कामे तर दूर काही लोकं हाताशी धरून स्वकीयांनाच त्रास देण्यास सुरूवात केली. उधारी तर कित्येक जागी ठेवलेली आहे, काही उधारी मागतकर्‍यांनी तर उधारी मागण्याचे सोडून दिले. मुरूमात पैसा खाल्ला, पोकलेन, जेसीबी किंवा ट्रॅक्टर ट्रॉली एखाद्या कामावर लावायची म्हटल्यावर त्यात कमिशन खाल्ले असा उतमात करणार्‍याच्या हाती काठी देवून कारभार हाकण्यास दिला म्हटल्यावर काय होईल हो..याचा विचार जरी केला तरी अंगावर शहारे आल्याशिवाय राहत नाही. संपूर्ण बारामतीतील एक कोपरा सांभाळण्यासाठी याला दिला, या कोपर्‍यातील नागरीक म्हणतात कारभार हाकणारा दाखवा आणि हजार रूपये मिळवा असे म्हणत आहेत. जर अशी परिस्थिती असेल तर हजारोंच्या ठेवी असणार्‍या बँक जर अशा व्यक्तीच्या हाती दिली पुढे काय होईल देव जाणे… अशी सभासद, खातेदार, ठेवीदार व बँकेच्या हितचिंतकांमध्ये चर्चेचा विषय बनला आहे. या महाशयाने एका नामवंत कंपनीचे करोडो रूपये थकविलेले आहेत. त्या कंपनीच्या महिला कर्मचार्‍यांनी यास फोन केला तर महिलांचा आदर करणे तर दूरच त्या महिलेला अपशब्द बोलून तिचा अपमान करीत असतो. लवकर या कंपनीचे मालक नेत्यांना भेटून याबाबत उलघडा करणार आहेत.

कारभार हाकणार्‍याने बँकेतून स्वकीयांना कर्जपुरवठा केला ती खाते एन.पी.ए.मध्ये गेलीत, तर काही कर्जदारांनी कर्जापोटी गहाण ठेवलेल्या मालमत्तेवर याचाच डोळा आहे. थकबाकीदार बँकेत आणायचा, दुसरा कर्जदार उभा करायचा त्याच्यावर बोजा चढवायचा आणि मध्यस्थी करून मलई खायची हा खरा धंदा याचा होता तो आता तेजीत चालणार यामध्ये शंका नाही.

बँकेचे वसुली पथक थकबाकीदारांकडे कर्ज वसुलीसाठी गेले असता, थकबाकीदार जर याचा पाहुणा, मित्र किंवा इतर आर्थिक देवाण-घेवाणीचे संबंध असतील तर पथक प्रमुख व पथकाला त्याकडे जावू नका असे आदेश देणारा बँकेचा कारभार हाकणार असेल तर येणार्‍या पुढील काळ बँकेसाठी अवघड आहे.

बँकेचे ज्या कुटुंबांनी रोपटं लावले ते रोपटं आज गगन भरारी घेत असताना त्या कुटुंबातील व्यक्तींना डावललं जात असेल तर बँकेचा कारभार कोणत्या दिशेने सुरू आहे हे सांगण्याची सुज्ञ सभासदांना गरज नाही.

या बँकेवर असणारा एका संचालकाने तर एका व्यापार्‍याला व्याजाने पैसे देवून त्या व्यापार्‍याचा जीव घेतला राव..अशा व्यक्तीला संचालक केले. या संचालकाने सावकाराचा परवाना जमा केला. जरी जमा केला असला तरी पैसा गोळा करण्याचा धंदा बंद होईल का? आजही या संचालकाचे लाखो रूपये व्यापारी वर्गात फिरत आहेत अशी लोकं नामांकित बँकेवर संचालक झाली ही खूप खेदाची बाब वाटते.

ज्याप्रमाणे जुनी माणसं देवाचं पांग फेडण्यासाठी मुकी जनावरे देवाला सोडून देतात त्याप्रमाणे एक कटाळ्याला पुन्हा संचालक पदावर संधी दिली. त्याला फक्त पद हवे मग ते कुठले का असेना..त्याला काहीही विचारा तो फक्त मान डोलवतो आणि हसतो एवढंच कामासाठी त्यास घेतलेले दिसत आहे. हा सुद्धा खूप मोठा सावकार आहे म्हणे.

कर्ते संचालक डावलून काही नाकर्त्यांना घेवून बँकेची वाटचाल नक्की कुठे चालली हा प्रश्र्न सभासदांना पडलेला आहे. यामधील काही संचालकांना पाहुन सर्वसामान्य नागरीक, व्यापारी, उद्योजक आपला रस्ता बदलतात अशांना बँकेचा कारभार हाकण्यास सांगितला म्हटल्यावर येणार्‍या काळात ठेवीवर व्यवहारावर परिणाम झाल्याशिवाय राहणार नाही.

मागील काही संचालकांचा चेहरा पाहुन, वाचुन लोकं विश्र्वासाने ठेवी ठेवत होती. खाती उघडीत होती. परंतु, सध्या बँकेचा कारभार हाकणार्‍याच्या हाती काठी देणार्‍याला पाहुन सभासदांनी ठेवी काढू नये म्हणजे झाले. येणारा काळच ठरवेल बँक नक्की कोणत्या प्रगतीपथावर आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!