शारदानगर(वार्ताहर): ऍग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट बारामती अतर्ंगत शारदाबाई पवार महिला महाविद्यालयास भारत सरकारच्या प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग (PMFME) योजनेअंतर्गत फूड प्रोसेसिंग इनक्युबेशन सेंटर मंजूर झाले असुन अनेक तरुण-तरुणी आपल्या नव नवीन कल्पना प्रत्यक्षात आणण्यासाठी या केंद्राचा लाभ घेऊ शकतील व स्वतःचे स्टार्ट-अप उभा करून उद्योग निर्मिती करू शकतील असे संस्थेचे चेअरमन राजेंद्र पवार यांनी सांगितले.
या केंद्राच्या माध्यमातून वेगवेगळी फळे, पालेभाजी, दूध यांचेवर प्रक्रिया करून, नवनवीन उत्पादने तयार करण्याचे प्रशिक्षण व बाजारपेठ मिळवून देण्याकरिता आवश्यक असे ज्ञान नवउद्योजकांना देण्यात येईल. संस्थेचे हे महाविद्यालय अशा प्रकारचे इनक्युबेशन सेंटर मिळवणारे महाराष्ट्रातील नव्हे तर देशातील पहिले अनुदानित महाविद्यालय ठरेल.
उपप्राचार्य डॉ. श्रीकुमार महामुनी, प्रा. जया तिवारी व प्रा. निलेश नलावडे यांनी समितींसमोर सादरीकरण केले. आलेल्या सर्व प्रस्तावाची छाननी केली. केंद्र सरकारचे अन्न प्रक्रिया मंत्रालयामार्फत शारदाबाई पवार महिला महाविद्यालयाची निवड करणेत आली. सदरील निवड प्रधान कृषी सचिव एकनाथ डवले, कृषि आयुक्त तथा राज्यस्तरीय कार्यकारी समितीचे अध्यक्ष धिरज कुमार, कृषी प्रक्रिया व नियोजनाचे संचालक सुभाष नांगरे यांनी अधिकृत घोषणा केली.
भिमथडी जत्रेच्या प्रवर्तक व महिला बचत गटांकरिता कार्यरत असलेल्या संस्थेच्या विश्वस्त व सचिव सौ. सुनंदा पवार यांनी सांगितले की, आपल्या महिला व तरुणींकडे आपल्या परिसरातील भाजी, फळे यावर आधारित व परंपरागत पदार्थ जसे कुरडई, शेवया, पापड इत्यादी तयार करण्याचे कसब आहे. त्या सुगरणी आहेत; परंतु त्यांना त्यांचा उद्योगधंदा कसा वाढवायचा व अर्थप्राप्ती कशी करायची, यासाठी पॅकींग अथवा वेगळी रेसिपी कशी करायची याचे प्रशिक्षण सदर इनक्युबेशन सेंटर मार्फत देईल. ऍग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट, महिला व तरुणींना स्वतःच्या पायावर उभारण्याचे काम करीतच आहे. हे काम करताना या केंद्राचा अधिकचा फायदा मिळेल. संस्थेने हाती घेतलेल्या महिला सक्षमीकरण कामास गती देईल याचा आनंद वाटतो.
पुणे जिल्यातील महिला बचत गट, शेतकरी गट, शेतकरी उत्पादक कंपनी (FPC), सहकारी संस्था यांना आपल्या शेतमालावर प्रक्रिया करण्याची सामुहिक सुविधा उपलब्ध होऊन प्रक्रिया केलेल्या मालाची गुणवत्ता व बाजारपेठेसाठी प्रशिक्षण व मार्गदर्शन करण्यात येणार आहे.
या योजनेअंतर्गत महाविद्यालयास 1 कोटी 3 लाख हजार रुपयांचे अनुदान प्राप्त झाले आहे. सदर प्रस्ताव करणेकामी संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रा. निलेश नलावडे, AIC-ADT च्या प्रमुख प्रा. जया तिवारी, प्रा. अमित काळे, श्री सुहास ननावरे, महाविद्यालयाचे उपप्राचार्यडॉ. श्रीकुमार महामुनी, प्राचार्य डॉ. साठे एस. जे. यांनी परिश्रम घेतले. तसेच राज्यस्तरीय तांत्रिक संस्थेचे समन्वयक श्री चंद्रकांत भोर व डॉ. मिलिंद जोशी यांचे तांत्रिक मार्गदर्शन प्राप्त झाले. या प्रकल्पाकरिता ICAR मान्यताप्राप्त राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्र पुणे हे मार्गदर्शक असणार आहेत. प्रा. जया तिवारी यांनी सांगितले, या प्रकल्पाचे व्यापारी तत्त्वावर अर्थात ओडिओपी म्हणजे एक जिल्हा एक उत्पादन अंतर्गत वैयक्तिक तसेच गटागटाने उद्योजकांना मार्गदर्शन तसेच त्यांना ही सुविधा उपलब्ध करून दिली जाईल. अशा प्रकारचे भारत सरकारच्या अन्नप्रक्रिया उद्योग मंत्रालयाची योजना मंजूर झाल्याने अनेक विद्यार्थी, महिला यांच्यामध्ये उद्योजकतेचा विकास होईल. स्पर्धेच्या जगात नोकरीपेक्षा स्वतः कौशल्य प्राप्त करून स्वतःचा उद्योगधंदा उभारणे हे महत्त्वाचे आहे.