जगभरात बहुतांश ठिकाणी 25 डिसेंबर हा दिवस ख्रिस्त जन्मदिन म्हणून साजरा केला जातो. येशू ख्रिस्ताच्या जन्माचे सत्य काय आहे हे आपण जाणून घेऊ या. परमेश्र्वराने मातीपासून मनुष्य तयार केला आणि त्यामध्ये जीवनाचा श्र्वास फुकला आणि मनुष्य जीवधारी प्राणी झाला. अखिल सृष्टीचा निर्माण कर्ता परमेश्र्वर या मनुष्यांवर खूप प्रीती करतो आणि म्हणूनच सैतान जो जिवंत परमेश्र्वराचा शत्रू आहे त्याने मनुष्याला पापात पाडले आणि त्याला देवापासून दूर करण्याचा प्रयत्न केला आणि पाप जगात आले. त्याच्या मागे सार्वकालिक मरण देखील आले. परमेश्र्वर अखिल मानवजातीवर प्रेम करणारा परमेश्र्वर आहे आणि म्हणूनच मनुष्याला सार्वकालिक मरण नव्हे तर सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावे ही त्यांची इच्छा आहे. त्यासाठी त्याने जगाच्या उत्पत्तीपूर्वीच एक योजना तयार केली होती आणि त्या योजनेनुसार परमेश्र्वराने आपल्या स्वत:चा एकुलता एक पुत्र अखिल मानवजातीच्या पापासाठी बलिदान करण्याचा निर्णय घेतला. परमेश्र्वराने स्वत:च्या पुत्राला मनुष्य बनवून या भूतलावर पाठविले. परमेश्र्वर पवित्र आहे तसाच त्याचा पुत्र देखील पवित्र आहे हे पावित्र्य राखण्यासाठी, परमेश्र्वराने आपल्या पुत्राला या भूतलावर आणण्यासाठी एका पवित्र कुमारीकेची निवड केली. ही कुमारीका पुरूषाद्वारे नव्हे तर देवाच्या पवित्र आत्म्याद्वारे गर्भवती झाली आणि तिने एका पुत्राला जन्म दिला. परमेश्र्वराने सांगितल्याप्रमाणे त्याचे नाव येशू असे ठेवण्यात आले. या नावाचा अर्थ पापापासून तारणारा, हाच येशू अखिल मानवजातीचे पाप स्वत:वर घेण्यासाठी मसिहा म्हणजे ख्रिस्त बनून आला. 33 वर्षे तो या भूतलावर राहिला. वयाच्या 30 व्या वर्षापासून त्याने परमेश्र्वराच्या राज्याची घोषणा या भूतलावर केली आणि परमेश्र्वराच्या योजनेनुसार अखिल मानव जातीच्या पापासाठी त्याने वधस्तंभावर आपला प्राण दिला. तीन दिवसानंतर परमेश्र्वराने त्याला मरणातून उठविले आणि जिवंत असे वर स्वर्गात घेतले तोच येशू जे त्याच्यावर विश्र्वास ठेवतात त्यांना घ्यावयास परत येणार आहे. त्याच येशू ख्रिस्ताचा जन्म दिवस आपण खिस्त जन्म उत्सव म्हणून साजरा करीत आहेत. अखिल सृष्टीचा निर्माणकर्ता परमेश्र्वर त्या प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे आपणा सर्वांस अशिर्वादीत करो हीच या ख्रिस्त जन्म उत्सवाच्या दिनी आपणा सर्वांस शुभेच्छा आहे. (आमेन)
– मि.वैभव वसंत पारधे