सौ.सुनेत्रावहिनी पवार यांना श्री मोरया गोसावी जीवनगौरव पुरस्कार प्रदान
बारामती(वार्ताहर): प्रथमच एका महिलेला श्री मोरया गोसावी जीवनगौरव पुरस्कार मिळाल्याने आनंद तर होतोच आहे परंतु, जबाबदारी सुद्धा वाढली असल्याचे प्रतिपादन बारामती टेक्सटाईल पार्कच्या अध्यक्षा सौ.सुनेत्रावहिनी पवार यांनी केले.
चिंचवड देवस्थान ट्रस्टच्या वतीने देण्यात येणारा यावर्षीचा श्री मोरया गोसावी जीवनगौरव पुरस्कार सुनेत्रा अजित पवार यांना प्रदान करण्यात आला. यावेळी पुरस्काराला उत्तर देताना त्या बोलत होत्या.
श्रीमन महासाधू श्रीमोरया गोसावी यांचा 460 वा संजीवन समाधी महोत्सव चिंचवड येथे सुरु आहे. संजीवन समाधी महोत्सवात शैक्षणिक, सामाजिक, उद्योग, महिला सबलीकरण अशा विविध क्षेत्रातील त्यांच्या कामगिरीबद्दल सुनेत्रा पवार यांनाजीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी मोरया गोसावी पुरस्काराने विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या व्यक्तींचा गौरव करण्यात आला. या कार्यक्रमासाठी अजिंक्य डी.वाय. पाटील विद्यापीठाचे उपाध्यक्ष डॉ.एकनाथ खेडकर प्रमुख उपस्थित होते. तसेच खासदार श्रीरंग बारणे, मुख्य विश्वस्त मंदार महाराज देव, विश्वस्त विश्राम देव, हभप आनंद तांबे, ऍड. राजेंद्र उमाप, विनोद पवार, महेश पाटसकर, अतुल भंडारे, नगरसेवक मोरेश्वर शेंडगे, अपर्णा डोके, अश्विनी चिंचवडे, मंगला कदम, पोलीस अधीक्षक मिटेश भटके, पोलीस उपायुक्त शहाजी उमाप आदी उपस्थित होते.
पुढे पवार म्हणाल्या की, हा गौरव माझ्या एकटीचा नसून माझ्यासोबत काम करणार्या प्रत्येकाचा आहे. कुठल्याही चांगल्या गोष्टीची सुरुवात अडथळ्यांनी होते. मी सामाजिक कार्याची सुरुवात केली त्यावेळी अनेक अडचणी आल्या. शिस्त आणि स्वच्छता यांना महत्त्व देऊन काटेवाडी गावात ग्रामस्वच्छतेच काम केलं. पुढे या कामाची व्याप्ती वाढली आणि लोक जोडत गेले. यातून पुढे ग्रामस्वच्छता, जलसंधारण, पर्यावरण रक्षण, आरोग्य, शिक्षण, महिला सशक्तीकरण या क्षेत्रात काम झालं आहे, असे मत सुनेत्रा पवार यांनी यावेळी व्यक्त केले.
यावेळी डॉ.एकनाथ खेडकर, खा.श्रीरंग बारणे यांनी मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक राजेंद्र उमाप यांनी तर अनिल सावळे पाटील यांनी सूत्रसंचालन केले. हभप आनंद तांबे यांनी आभार मानले.