बारामती(वार्ताहर): असतील शिते तर नाचतील भुते या म्हणीप्रमाणे सर्वजण त्यांच्याकडे जातात, हाजी..हाजी..करतात मात्र, ज्यांनी माणुसकी, एकनिष्ठता, उच्च विचार, सुख-दु:खात रात्री-अपरात्री मदतीसाठी धावतात असे सर्वसामान्य कुटुंबातील राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष संभाजी (नाना) होळकर यांची पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालकपदी बिनविरोध निवड झाल्याने सर्व स्तरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
संभाजी होळकर यांना उमेदवारी मिळाली त्यावेळी सुद्धा त्यांच्या चाहत्यांनी आनंद व्यक्त केला. उमेदवारी बिनविरोध झाली तर अत्यानंद व्यक्त करीत त्यांचा आनंद गगनभरारी घेत होता. हे सर्व संभाजी होळकर यांनी केलेल्या कामातून समोर येत आहे. संभाजी होळकर यांनी कधीही दुजाभाव केला नाही. जात-पात, वंश, लहान-मोठा न पाहता सर्वांना बरोबर घेऊन काम केले. सुख-दु:खात हजेरी लावण्याचे काम त्यांनी केले व करीत आहेत.
राष्ट्रवादी कॉंग्रेस भवनात येणार्या प्रत्येक माणसाचे काम झाले पाहिजे त्याची निराशा होता कामा नये हा उद्देश ठेवून ते काम करीत आलेले आहेत. राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या तालुका अध्यक्ष पदाला न्याय देण्याचे काम त्यांनी केले आहे.
पुणे जिल्ह्यातील केंद्रीय वित्तपुरवठा करणारी संस्था म्हणून जिल्हा बँकेला व्यासपीठ म्हटले जाते. देशातील कृषी वित्तीचा कणा म्हणून या बँकेकडे पाहिले जाते. जिल्ह्यात सहकार चळवळ या बँकेने विकसित केली आहे. ग्रामीण व शहरी भागात बँकींग सुविधांचा विकास करून विस्तार केला आहे. अशा बँकेवर सर्वसामान्य कुटुंबातून आलेल्या संभाजी होळकर यांची निवड केल्याने राज्याचे उपमुख्यमंत्री ना.अजित पवार यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.