बारामती(वार्ताहर): बारामती वकील संघटनेचे माजी अध्यक्ष ऍड.पी.टी.गांधी यांना डॉ.बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करण्यात आला. बाबू जगजीवन राम कला, संस्कृती तथा साहित्य अकादमी, नवी दिल्ली, यांच्या वतीने 14 डिसेंबर 2021 रोजी, राजेंद्र भवन, दिल्ली येथे 50व्या राष्ट्रीय विजय दिन सोहळ्यात महाराष्ट्रातील दहा मान्यवर मान्यवरांना पुरस्कार प्रदान करण्यात आले.
देशाचे माजी उपपंतप्रधान बाबू जनजीवन राम यांच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी तसेच भारतीय लष्कराच्या दैदिप्यमान इतिहासाची साक्ष म्हणून दरवर्षी डिसेंबर महिन्यात राष्ट्रीय विजय दिन सोहळ्याच्या निमित्ताने राष्ट्रीय विजय दिन सोहळ्याचे आयोजन करण्यात येते.
अकादमीच्या वतीने आयोजित 50व्या राष्ट्रीय विजय दिनानिमित्त राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करण्यात आले. देशातील मान्यवर विशेष सामाजिक कार्य करणार्या समाज सेवकांचा सन्मान करण्यात आला. महाराष्ट्रातील 10 सेवा भावी सामाजिक कार्यात योगदान करणार्यांना सन्मान पदक देऊन गौरविण्यात आल्याची माहीती बाबु जगजीवन राम कला, संस्कृती तथा साहित्य अकादमीचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ नफेसिंह खोबा व महाराष्ट्र राज्य सचिव प्रा. गोरख साठे यांनी सांगितली.
बारामती वकील संघटनेचे माजी अध्यक्ष ऍड. पी.टी.गांधी यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय पुरस्कार माजी लोकसभेचे अध्यक्षा श्रीमती मिराकुमार यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. यावेळी केंद्रिय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले, भाजपाचे लातूरचे माजी खासदार डॉ.सुनिल बळीराम गायकवाड, महाराष्ट्राचे माजी समाज कल्याण मंत्री बबनराव घोलप, अखिल भारतीय कॉंगेस कमिटीचे प्रवक्ते अंशूल अविजीत, बाबू जनजीवन राम कला संस्कृती तथा साहित्य अकादमीचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. नफेसिंह खोबा, आंतरराष्ट्रीय महासचिव टी.एम. कुमार, आदी मान्यवरांच्या उपस्थितीत पुरस्कार प्रदान करण्यात आला.
ऍड.पी.टी. गांधी यांच्या सामाजिक कार्याची दखल अकादमीच्या वतीने घेतली असून उपेक्षित, वंचित समाज उभारणी कार्यात ऍड.गांधी यांनी अद्वितीय योगदान दिले आहे. जुने ते सोने असे म्हणणारे ऍड.गांधी यांना जुन्या नोटा, जुन्या नाण्यांचा वस्तूंचा संग्रह करण्याचा छंद आहे. कोरोना वैश्विक महामारीत अनेकांना मदत केली असून भाकड गोवंशाची पालन पोषण करणे, संरक्षण संवर्धन गायांचे करणे, गोवंशाची हत्या रोखणे, मोफत कायदेशीर सल्ला देऊन समाजात सामाजिक समरसतेचे भावना वृद्धींगत करणे आदी सामाजिक कार्यात त्यांनी हिरीहिरीने भाग घेतात. बारामती वकील संघटना मजबूत करण्यासाठी मोलाचे योगदान योगदान दिले आहे. या सर्व बाबींचा विचार करून त्यांना पुरस्काराने गौरविण्यात आले आहे.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणुन नेपाळ सरकारच्या अप्पर हाऊसचे खा. रामलखन, नेपाळ भारत मधेशी दलित मैत्री संघाचे चेअरमन राम सरण रैदास, बाबु जगजीवन राम कला संस्कृती तथा साहित्य अकादमी, नवी दिल्ली चे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ नफेसिंह खोबा उपस्थित होते. मला अकादमीचा डॉ. बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्याने जन्माचे सार्थक झाल्याची भावना ड. पी. टी. गांधी, बारामती यांनी व्यक्त केली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्याने सर्व पुणे जिल्हा स्तरावरच्या सामाजिक, राजकीय क्षेत्रातील मान्यवर व्यक्ती, संस्था यांच्या कडून ड. पी.टी.गांधी , बारामती यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.