अशोक घोडके यांजकडून…
इंदापूर(वार्ताहर): राजमाता अहिल्यादेवी होळकर महिला ग्रामसंघाने 500 झाडे लावण्याची घेतलेली जबाबदारीमुळे येणार्या काळात सरडेवाडी गाव ऑक्सिजन पार्क होण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सरडेवाडी ग्रामपंचायतीचे सरपंच सिताराम जानकर यांनी बोलताना सांगितले.
माझी वसुंधरा अभियान टप्पा-2 अंतर्गत ग्रामपंचायत सरडेवाडीच्या पुढाकारातून सरडेवाडीत राजमाता अहिल्यादेवी होळकर महिला ग्रामसंघाने 500 झाडे लावण्याची जबाबदारी घेतली आहे. त्याकरिता सरडेवाडीतील अंकुर रोपवाटिकेतून रोपे उपलब्ध करून दिली असल्याची माहिती ग्रामसेविका स्वाती चव्हाण यांनी दिली. यावेळी उपसरपंच हनुमंत जमदाडे, सदस्या प्रियंका शिंदे व वैशाली शिंदे यांच्या हस्ते वृक्षारोपण कार्यक्रम घेण्यात आले.
पुढे बोलताना जानकर म्हणाले की, माझी वसुंधरा अभियानांतर्गत असणारे सर्व निकष आम्ही तत्परतेने पूर्ण करणार आहोत, त्यासाठी महिला ग्रामसंघाने पुढाकार घेतला आहे याचे विशेष कौतुक करावे तेवढे कमी आहे. महिला ग्रामसंघाच्या प्रत्येक महिला सदस्याने एक झाड लावून ते जगवण्याची हमी घेतली आहे ही खूप मोठी बाब असल्याचेही ते म्हणाले.
यावेळी सदस्या सुप्रिया कोळेकर, गयाबाई तोबरे, वैशाली कोळेकर, अलका कडाळे, सतीश चित्राव, रविंद्र सरडे, गोकुळ कोकरे, विजय शिंदे, शिवाजी माने व महिला मोठ्या संख्येने सहभागी होत्या. ग्रामसेविका स्वाती चव्हाण यांनी आभार मानले.