खंडाळा: म्हणतात ना, पोलीस के हात बहोत लंबे होते है याचप्रकारे वाहन अपघातात मृत्यू पावल्याचा भितीपोटी फिर्याद देणारे बनाव करीत असल्याचे पोलीस निरीक्षक महेश इंगळे यांच्या दक्षतेमुळे समोर आल्याने प्रत्यक्षात खून करणारे आरोपी जेरबंद झाल्याने सर्वत्र महेश इंगळे व त्यांच्या टिमचे सर्वत्र कौतुक होत आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, दि.12 डिसेंबर 2021 रोजी सायंकाळी 6.30 वाजणेच्या सुमारास खंडाळा पोलीस ठाणे हद्दीत मौजे पारगाव (ता.खंडाळा) गावचे हद्दीत पुणे ते सातारा हायवेवर पिराचा दर्गा नजीक एका दुचाकी वाहनाचा अपघात होवून त्यामध्ये तीन वाहनस्वारांपैकी प्रशांत प्रकाश पवार (रा.अनवडी, ता.वाई जि.सातारा) याचा मृत्यू झाला असल्याचे फिर्यादी ओंकार प्रकाश पवार (मयताचा भाऊ) व जखमी साक्षीदार प्रकाश आबाजी पवार (मयताचे वडील) या दोघांनी खंडाळा पोलीस ठाणेत फिर्याद दिली. सदर फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला होता.
सदर गुन्याचा पोलीस तपास करीत असताना अपघातातील मयत इसम प्रशांत प्रकाश पवार हा अपघातात मरण पावलेल्या नसून त्याला आरोपी नामे (1) हणमंत ऊर्फ प्रकाश संपत यादव (वय 35 वर्षे) (2) सचिन नामदेव यादय (वय 43 वर्षे) (3) अभिषेक ऊर्फ गौरव शिवाजी यादव (वय 22 वर्षे) (4) विजय गणपत यादव (वय 39 वर्ष) (5) कुणाल भानुदास यादव (वय 23 वर्षे) सर्व रा. पारगाव ता खंडाळा जि. सातारा यांनी मौजे पारगाव, ता मंडाळा गावचे हद्दीतील रानातील एका शेडमध्ये नेवून लाकडी दांडके व फायबर काठ्यांनी मारहाण केली तसेच त्यानंतर मौजे पळशी, ता खंडाळा येथे मयत, जखमी साक्षीदार यांना आरोपी आशा गोळे हिचे घरी घेवून जावून पुन्हा घरील पाच आरोपी व इतर आरोपी (6) वैष्णवी बाळकृष्ण शिदे (रा.पारगाव, ता.खंडाळा जि. सातारा) (7) आशा ज्ञानदेव गोळे (रा.पळशी ता.खंडाळा) (8) आशा फुलचंद मोरे (रा.वाण्याचीवाडी,ता. खंडाळा) यांनी लाकडी दांडके व फायबर काडयांनी आणि लाथा बुक्यांनी परत मारहाण केली.
या मारहाणीत फिर्यादी व जखमी साक्षीदार यांनाही वरील आरोपींनी मारहाण केलेली आहे. मयत यास आरोपींनी केलेल्या मारहाणीत तो मरण पावल्याचे लक्षात आलेनंतर आरोपींनी मयतास हॉस्पीटलमध्ये उपचाराकरिता नेले असता, तो मयत झाल्याचे लक्षात आले. त्यानंतर आरोपींनी फिर्यादी व साक्षीदार यांना जीवे मारण्याची धमकी देवून अपघात झाल्याचा बनाव करुन त्यांना खोटी बनावट तक्रार देण्यास भाग पाडल्याचे निष्पन्न झालेले आहे. त्यामुळे सदर गुन्ह्यास भा.दं.वि.क.302,307, 326, 324, 347,201,120(ड),504,506 हा कलमांची वाढ करुन खालील नमुद आरोपींना अटक करण्यात आलेली आहे.
सातारा पोलीस अधीक्षक सातारा अजयकुमार बन्सल, सातारा अपर पोलीस अधीक्षक अजित बोहाडे उपविभागीय पोलीस अधिकारी तानाजी बरसे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक महेश इंगळे व पोलीस पथकातील पोलीस अधिकारी शंकर पांगारे, पोलीस अंमलदार संजय धुमाळ, सुरेश मारे, तुषार कुंभार,प्रशांत धुमाळ, सचिन धीर हे सदर गुन्ह्याचा पुढील तपास करीत आहेत.