अशोक घोडके यांजकडून…
गोतोंडी(वार्ताहर): इंदापूर बारामती मार्गालगत असलेल्या बंगल्यामध्ये अज्ञात चोरट्यांनी दुपारी घराच्या दरवाजाचे कुलूप तोडून दरोडा घातल्याचा प्रकार घडला.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, शविारी दुपारी गोतोंडी हद्दीतील दिलावर वजीर शेख यांच्या बंद असलेल्या बंगल्याचे कुलूप तोडून चोरट्याने घरामध्ये प्रवेश केला. कपाटामध्ये ठेवलेले दागिने व रोख रक्कम 41 हजार असा 1 लाख 32 हजारांचा ऐवज लंपास केला.

बंगल्याच्या बाहेर सतत असणारे पाळीव कुत्र्याला सुद्धा या चोरट्यांनी मांसामध्ये नशेली औषधे टाकून त्यास गप्प करून चोरी केली. 5 तोळ्याचे दागिने चोरीला गेले असल्याचे वजीर शेख यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले. जुनं सोनं असल्याचे काहींच्या खरेदी पावत्या आहेत तर काहींच्या नसल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
याप्रकरणी आफसाना दिलावर शेख (वय-45) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार वालचंदनगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक बिरप्पा लातुरे, पोलीस उपनिरीक्षक अतुल खंदारे, गोपनीय विभागाचे विनोद पवार यांनी घटनास्थळी भेट दिली. तपास पोलीस हवालदार रवि पाटमास करीत आहेत.