राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष देशाचे भाग्यविधाते, माजी केंद्रीय कृषिमंत्री यांच्या उच्च विचारावर समाजात काम करीत आलेले आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षातर्फे पवार साहेब, अजितदादा व सुप्रियाताईंचा वाढदिवस न चुकता साजरा केला जातो. तत्पुर्वी पक्ष वाढदिवस कशापद्धतीने साजरा करायचा, कोण-कोणते कार्यक्रम घ्यायचे याबाबत एका बैठकीचे आयोजन करीत असते.
सदरची बैठक तालुक्यात असेल तर तालुक्यातील पदाधिकारी, शहरात असेल तर शहरातील पदाधिकारी उपस्थित असतात. नुकत्याच झालेल्या शहरातील बैठकीत शहराचे अध्यक्षच गैरहजर होते असो., मात्र तेच-ते कार्यकर्ते न चुकता हजर होते, आपले तुटके-फुटके मनोगतात साहेब,दादा व ताईंवरील प्रेम व्यक्त करून आपल्या भावना प्रकट करीत होते. कोण काय कार्यक्रम घेणार याबाबत साधक-बाधक चर्चेनंतर, त्यानुसार कार्यक्रम पत्रिका तयार करून कार्यक्रम राबविले जातात.
या बैठकीत ज्यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षातर्गंत काम करीत असलेल्या संस्थेवर पदे भूषविली किंवा पदे घेतली ही लोकं बैठकीला पाठ फिरवतात ही खूप मोठी शोकांतिका आहे. जे निष्ठावंत कार्यकर्ते आहे इमाने-इतबारे पक्षाचे काम करतात, कार्यक्रम स्थळी पक्षाचा झेंडा हाती घेऊन घोषणा देतात, पक्षाचे उच्च विचार तळागळात पोहचविण्याचा मनोमन प्रयत्न करतात अशा लोकांना डावलून मात्र विविध संस्थांवर पदे दुसरीच लोकं भूषवितात याचे खूप वाईट वाटते. पक्षातील सर्वसामान्य साधा कार्यकर्ता हा विविध संस्थेवर पदे भूषविणार्यापेक्षा श्रेष्ठ असतो हे पदे घेणार्यांनी विसरता कामा नये. पक्षाची पायेमुळे मजबुत करणारा हाच खरा कार्यकर्ता असतो. मात्र, त्या कार्यकर्त्याला पदे भूषविणारी किंवा भूषवून गेलेली मंडळी दुय्यम स्थान देत असतात ही खूप खेदाची बाब आहे.
पाच वर्ष पदे घेवून राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाशी निष्ठावंत राहणारी मंडळी खुप येऊन गेली त्यांची कृती, स्वभाव याच कार्यकर्त्यांनी खुप जवळून पाहिला. पण पद भूषवून गेलेला पुन्हा कधी आला नाही मात्र, हा कार्यकर्ता त्याचठिकाणी, त्याच बैठकीला हजर राहुन साहेब, दादा व ताईंवरील प्रेम व्यक्त करून पक्षाची धुरा पुन्हा हाती घेवून एकनिष्ठेने काम करीत असतो. या निष्ठावंत कार्यकर्त्यांची दखल पक्ष घेणार आहे का नाही ही धगधग सर्वांच्या मनात घर करून बसली आहे.
एकनिष्ठेने काम करणारी मंडळी, कार्यकर्ते आंदोलन, पक्षाच्या कार्यक्रमात गेली असता किंवा कुठे थांबलेली असली तरी त्यांना राष्ट्रवादीचा कार्यकर्ता म्हणून संबोधले जाते. एवढी ओळख त्यांची निर्माण झालेली आहे. पण विविध संस्थांवर पदे भूषवून गेलेला कुठे थांबलेला असला तर, पद गेले आता कोण –त्रही विचारीत नाही असे बोलले जाते. त्यामुळे या पद भूषविणार्यांनी पक्षाची सतत सलग्न राहण्याची गरज आहे. पद आज आहे उद्या नाही मात्र पक्षाचा कार्यकर्ता म्हणून ओळख कायम राहणार आहे, याचे भान पदे भूषविणारे विसरलेले आहेत.
या एकनिष्ठ काम करणार्या कार्यकर्त्यांनी पदे घेणारे व भूषविणार्यांचा प्रचार व प्रसार केला नसता तर, तुमची समाजात, मतदारात काय किंमत आहे हे समजले असते. राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष व त्याचा निष्ठावंत कार्यकर्ता याचा या लोकांना विसर पडलेला दिसत आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा पद्मविभूषण खा.शरदचंद्रजी पवार साहेबांच्या वाढदिवसाची कार्यक्रम पत्रिका पाहिली असता, तेच-ते कार्यकर्ते तन-मन व धनाने साहेबांवरील प्रेम व्यक्त करीत असतात व समाजात पवार साहेबांचा आदर्श ठेवत असतात. विविध संस्थांच्या मोठ्या हुद्द्यावर काम करणारी मंडळी याच कार्यकर्त्यांना दुय्यम स्थान देताना दिसतात. त्यांचे कार्य, एकनिष्ठा याचा विसर त्यांना पडतो ही खूप मोठी शोकांतिका आहे. बारामती शहरात व तालुक्यात अशी काही निष्ठावंत कार्यकर्ते आहेत त्यांना खरं तर साहेब, दादा व ताईंनी एकत्रात बोलवून त्यांना मान,सन्मान दिला पाहिजे. त्यांच्या अडीअडचणी जाणून घेवून त्यावर मार्ग काढण्याची गरज आहे. कारण पक्षाचा खरा आरसा हेच निष्ठावंत कार्यकर्ते आहेत यांना विसरला तर पक्षाचा आरसा कितीही धुतला तरी प्रतिमा स्वच्छ दिसणार नाही एवढं मात्र खरे..