पुणे(वार्ताहर): कौसल्या पब्लिकेशन, पुणे यांच्या वतीने तयार केलेल्या व महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे शिक्षक विनोद पारे यांनी लेखन केलेल्या जलसुरक्षा उपक्रम व कार्यपुस्तिका नोंदवहीचे प्रकाशन मुख्याध्यापक संघाचे मा. अध्यक्ष हरिश्चंद्र गायकवाड यांच्या हस्ते करण्यात आले.
शनिवार दि.11 डिसेंबर 2021 रोजी सायं. 4 वा. मुख्याध्यापक संघाच्या कार्यालयात प्रकाशन सोहळा घेण्यात आला होता.
प्रकाशन समारंभावेळी श्री.गायकवाड मनोगत व्यक्त करताना म्हणाले की, जलसुरक्षा या नव्याने सुरू झालेल्या विषयासाठी कौसल्या पब्लिकेशन यांनी तयार केलेली कार्यपुस्तिका म्हणजे शासनाने तयार केलेल्या जलसुरक्षा या विषयाच्या अभ्यासक्रमाला पूर्ण न्याय देण्याचा चांगला प्रयत्न केला आहे. इयत्ता 9 वी व 10वी विद्यार्थ्यांना जलसुरक्षा या विषयाचे पाठ्यपुस्तक वापरावे लागणार नाही. पाठ्यपुस्तक व कार्यपुस्तिका यांचे एकत्रिकरण अशी रचना व सर्व माहिती या कार्यपुस्तिकेत आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे इतकी आकर्षक छपाई, चांगला कागद व रंगसंगतीचा वापर करूनही कमी किंमतीत जलसुरक्षा ही कार्यपुस्तिका उपलब्ध केली आहे. निश्चितपणे सर्व शाळांनी व विद्यार्थ्यांनी या कार्यपुस्तिकेचा वापर करावा असेही आवाहन त्यांनी यावेळी केले.
यावेळी संघाचे कार्याध्यक्ष नंदकुमार सागर व संघाचे सचिव कांचन सर तसेच पुस्तकाचे लेखक विनोद पारे व कौसल्या पब्लिकेशनचे संचालक अविनाश ढुमे, आदिनाथ कोष्टी व अजय गायकवाड उपस्थित होते. श्री. सागर सर यांनी उपस्थितांचे आभार मानले. या वेळी विविध शाळेतील मुख्याध्यापक उपस्थित होते.