दादाऽऽ..चालकावर एवढा विश्र्वास…

राज्याचे उपमुख्यमंत्री ना.अजितदादा पवार यांनी बारामती सहकारी बँकेच्या पंचवार्षिक निवडणूकीत प्रवास करणारी 1+14 सीट असणारी बस भरून सोडली. मात्र, या बसचा जो चालक (ड्रायव्हर) अनुभवी नाही त्याने मागील पाच वर्षात केलेले अपघात पराक्रम पाहता इतर 14 प्रवासी जीव मुठीत धरून प्रवास करणार असे दिसत आहे. या चालकावर दादांचा एवढा विश्र्वास कसा? याबाबत तर्कवितर्क काढला जात आहे.

त्या चालकाचा काय दोष, अजितदादांनी गाढा विश्र्वास देत घरात छकडा हाकणारा जर थेट चालक बनविला तर तो बसमध्ये आणखी लोकं कोंबली तरी तोच श्रेष्ठ ठरणार आहे असे दिसत आहे. वाहतुकीच्या नियमांचे पालन न केल्यास, आपण ऐकतो दरवर्षी राज्यात कितीतरी मोठ्या प्रमाणात अपघात होत असतात. सध्या बारामती सहकारी बँकेची बस गावातील खेड्या-पाड्याच्या रस्त्यावर चालताना एखादा शेतात ट्रॅक्टर चालवणारा किंवा घरचा छकडा हाकणारा चालक असला तरी चालु शकत होता. मात्र, या बसने बाळसं धरलं आहे, राष्ट्रीय महामार्गावर ही बस आता धावत आहे. दरवर्षी होणार्‍या अपघातात महामार्गावर होणारे अपघाताची नोंद जास्त आहे अशी शासनाची आकडेवारी सांगते. त्यामुळे ही बस महामार्गावर चालत असताना अनुभवी, विनाअपघात करणारा चालक असणे गरजेचे होते. मात्र, अजितदादांनी पुन्हा त्याच चालकाला बसमध्ये बसण्यास प्रथम संधी देत, त्याच्याच हाती बसच्या चाव्या दिल्या आहेत. त्यामुळे बसमधील इतर 14 प्रवासी सुखरूप पोहचतील का? व या बसवर अवलंबून असणारी इतर प्रवाशी आनंददायी, सुखरूप प्रवासाला समाधानी मानतील का? हे ही तितकेच महत्वाचे आहे.

काही प्रवासी म्हणतात या चालकाला जर मनमानेल तिथं बस घेऊन जा, बस नियमांची पायमल्ली केली तरी चालेल किंवा वाहतुकीचे नियम धाब्यावर बसविले तरी चालेल असे म्हणून चेअरमनपद बहाल केले तर गेल्या पाच वर्षात केलेल्या अपघातात आणखी भर पडेल. अपघातग्रस्तांना तात्काळ मदत पोहोचवण्यासाठी यंत्रणा कमी पडल्या असे शासन सांगत आहे. सतत अपघात करणार्‍यांना जर अपघात का होतो, या अपघातामुळे बसचे मालक, बसचे मार्गदर्शक यांना ठेस पोहचत असेल तर, आपण घरचा छकडा चालवितो तोच बरा असे या चालकाला का कळत नाही.

बाळ मोठं झाले की, तो घरातील व्यक्तींना त्रास देतो, हट्ट करतो म्हणून त्यास अंगणवाडी किंवा खेळ विभागात टाकून तेवढे तीन-चार तास घर शांत राहते व घरातील व्यक्तींना काम सुचते तसाच काहीसा प्रकार या चालकाबाबत आहे का? असेही नागरीकांमध्ये बोलले जात आहे. या वाहन चालकाची मानसिकता कधी बदलेल हेच कळत नाही. जोपर्यंत मानसिकतेत बदल होणार नाही तोपर्यंत अपघात थांबणार नाही हे ही तेवढेच सत्य आहे.

बारामती सहकारी बँकेची बस महामार्गावर धावत आहे चांगली गोष्ट आहे. अजितदादांना छकडा किंवा ट्रॅक्टर चालविणारा चालक ठेवायचा असेल तर ठेवा, त्याला सर्व अधिकार बहाल करायचे तेही करा. मात्र, महामार्गावर अपघात होऊ नये किंवा झाल्यावर त्यांना तातडीने त्वरीत योग्य उपचार मिळण्यासाठी शासनाने मृत्युंजय दूत योजना केली आहे त्याप्रमाणे या बसचे हीत पाहणारे तातडीने, संकटकाळी मदत करणारे मृत्युंजय दूतांची यादी बनवून या बसवर नियंत्रण ठेवणारे निर्माण करण्याची गरज आहे. अन्यथा येणार्‍या काळात महामार्गावर सुसाट धावणार्‍या बसचा अपघात होईल व ज्या चालकावर विश्र्वास दिला तो विश्र्वासघात केल्याशिवाय राहणार नाही हे ही तेवढे सत्य आहे.

या बसचे वर्षाला सर्व्हिसिंग होणार आहेच, सर्व्हिसिंग करणार्‍यांना या चालकाने येणार्‍या काळात दमदाटी करून, दहा लिटर ऑईल लागत असेल तर पाच लिटरच टाका बिल मात्र दहा लिटरचे द्या असे म्हणू नये याची काळजी बसचे सर्व्हिसिंग करणारे व बसमध्ये प्रवास करणार्‍यांची पूर्ण जबाबदारी आहे. कारण हा चालक फक्त ही बस नव्हे तर दुसरे वाहन सुद्धा हाकतो त्याठिकाणी या चालकाने माती,मुरूमाचा अपहार केला आहे. जेसीबी, पोकलेन इ. लावणेसाठी कमिशन खाल्ले आहे. या चालकाला कॅनॉलवर फिरणारा मुकादम सुद्धा म्हटले जाते बरं का? त्यामुळे इतर 14 प्रवाशांनी पाच वर्ष दक्ष राहुन प्रवास केला पाहिजे अन्यथा तुम्ही साथ दिली तर बँकेच्या बसचा अपघात तर होईल आणि बस मालक, मार्गदर्शकाचे कधीही भरून न येणारे नुकसान होईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!