राष्ट्रीय वयोश्री योजना जेष्ठ नागरिक व दिव्यांग बांधवांना आधारवड – सौ. वैशाली पाटील

अशोक घोडके यांजकडून…
इंदापूर(वार्ताहर): राष्ट्रीय वयोश्री योजना जेष्ठ नागरीक व दिव्यांग बांधवांना आधारवड असल्याचे प्रतिपादन जिल्हा परिषदेच्या माजी सभापती व विद्यमान सदस्या सौ.वैशाली पाटील यांनी केले.

बारामती लोकसभा मतदार संघाच्या खासदार सौ.सुप्रिया सुळे यांच्या मार्गदर्शन संकल्पनेतून व सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री दत्तात्रय (मामा) भरणे यांचे सहकार्यातून इंदापूर तालुक्यामध्ये राष्ट्रीय वयोश्री योजनेच्या तपासणी शिबिराचे उद्घाटन करते समयी सौ.पाटील बोलत होत्या.

यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव पाटील, तालुकाध्यक्ष हनुमंत कोकाटे-पाटील, पंचायत समिती सदस्या सारिका लोंढे, जिल्हा नियोजन समितीचे सदस्य सचिन सपकळ, छत्रपती कारखान्याचे व्हा.चेअरमन अमोल पाटील, संजय गांधी निराधार योजना समितीचे तालुकाध्यक्ष सागर मिसाळ, राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष ऍड.शुभम निंबाळकर, पुणे जिल्हा राष्ट्रवादी महिला कॉंग्रेसच्या उपाध्यक्ष रेहना मुलाणी, डॉ.संजीव लोंढे, राष्ट्रवादीचे वरिष्ठ तालुका उपाध्यक्ष शिवाजी पानसरे, राष्ट्रवादीचे तालुका सरचिटणीस सुभाष डांगे-पवार, गटविकास अधिकारी विजयकुमार परीट यांच्यासह राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे अनेक मान्यवर पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

पुढे बोलताना सौ.पाटील म्हणाल्या की, लाभार्थांना वेगवेगळ्या सहाय्यक साधनांचे मोफत वाटप केले जाणार आहे त्यामुळे दीन दुबळे, ज्येष्ठ नागरिक तसेच दिव्यांग बांधवांना ही योजना आधार व नवसंजीवनी ठरत आहे. इंदापूर तालुक्यामध्ये या योजनेचा जास्तीत-जास्त लाभार्थ्यांना मिळण्यासाठी आ.दत्तात्रय भरणे यांनी स्वतः जातीने लक्ष घातले आहे. 60 वर्षांवरील सर्व जेष्ठ नागरिक व दिव्यांग बांधवांना मोठ्या प्रमाणावर फायदा होणार आहे. या लाभार्थ्यांच्या चेहर्‍यावर आनंद ओसंडून वाहताना दिसणार आहे. या योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे सर्व पदाधिकारी तन-मन व धनाने सहकार्य करीत आहे. शेवटच्या घटकापर्यंत या योजनेचा लाभ मिळाल्याशिवाय राहणार नाही असाही विश्र्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!